
Sanjay Dina Patil Audio Clip : उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या खासदारांनी तसे पत्रदेखील लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. या बंडखोर खासदारांची नावेही समोर आली असून त्यांची एकूण संख्या सहा आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचेदेखील नाव आहे. दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या काही ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये ते प्रचंड भडकलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मी बाथरुममध्ये आहे, फोटो पाठवू का, अशी भाषादेखील त्यांनी वापरलेली आहे. मलाही संजय राऊत यांच्यापेक्षा चांगल्या शिव्या येतात, असंही संजय दिना पाटील या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणताना दिसत आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय आहे?
संजय दिना पाटील यांचे बंडखोर खासदारांच्या यादीत नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मी कुठेही जाणार नाही, असे सांगणारे संजय दिना पाटील मात्र ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. ते बंडखोरी करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. परंतु त्याआधी पत्रकारांनी त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते खरंच बंडखोरी करणार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांना फोन कॉल केले. परंतु या फोन कॉलमध्ये संजय दिना पाटील प्रचंड संतापालेले दिसले.
तुम्हाला फोटो काढून पाठवू का?
मुंबईत आहात का? असे पत्रकाराने विचारले. यावर उत्तर देताना मी बाथरुममध्ये आहे. मी आता व्हिडीओ कॉल करून दाखवू शकत नाही. तुम्हाला फोटो काढून पाठवू का? असा संताप संजय दिना पाटील यांनी व्यक्त केला. तसेच तुम्ही लोकांनी हैराण करून सोडलं आहे. कोणाला किती त्रास देणार याच्या काही मर्यादा आहेत. सध्या मी मुंबईतच आहे. मला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे ते तुम्हाला समजेलच की. मी लपून तर हे काही करू शकत नाही. तुम्हाला सगळं समजेल की, असंही संजय दिना पाटील म्हणाले.
मी पण चांगल्या शिव्या देऊ शकतो?
संजय दिना पाटील यांना आणखी एका पत्रकाराने फोन कॉल केला. या पत्रकाला बोलतानाही संजय दिना पाटील यांचा पारा चढलेला दिसला. मी सोडून जाणार नाही. माझ्या संसदीय पक्षाची बैठक आहे. या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे, असे संजय दिना सांगत आहेत. मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास देऊ नका. संजय राऊत यांच्यापेक्षा चांगल्या शिव्या मी देऊ शकतो, असा दमही संजय राऊत देताना दिसत आहेत.