
ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला आहे, तर फुटीर खासदारांनी व्हिप झुगारला आणि ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. बंडखोर खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे ओमराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय सांगितला. या कालावधीत त्यांनी मनधरणी करायला ठाकरे गटातील कोणी गेलं होतं का? याबाबत संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ओमराजेंच्या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, ओमराजे यांचे विश्वासू असल्यामुळे कैलास पाटील हे त्यांच्या भेटीला गेले होते आणि त्यांच्यासोबत वरुण सरदेसाईदेखील होते. मात्र, त्यांची कोणत्याही प्रकारे मनधरणी आम्ही केली नाही… ते नामचिन गद्दार आहेत ते आहेतच… पुढे राऊत म्हणाले, ओमराजेंच्या वतीने 15 कोटी कोणी स्वीकारले हे उद्धव ठाकरेंना कळले आहे. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.