
राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
वरळीतील किंगमेकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सचिन अहिर यांनी बरीच वर्षे काम केलं आहे. त्यानंतर ‘वरळी हा ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे’ असे विरोधक म्हणतात, यावर सचिन अहिर यांनी थेट उत्तर दिलं; ते म्हणाले, ‘वरळीवर कोणाचा सातबारा लिहिला आहे. सामन्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या नेत्याची वरळी आहे. मी देखील तिथून निवडून आलो आहे ना, त्यामुळे २०१९ मध्ये मला वाटत होतं मी निवडणूक लढवण्याच्या तयारीत होतो, मात्र मी सहकार्य करण्याची भूमिका घेतली.’