
शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर सचिन आहिर यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन आहिर यांची विधान परिषतेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन आहिर यांनी शिवसेना ठाकरे गट सोडल्यानंतर त्यांच्यावर देखील टीका झाली. या सर्व प्रश्नांना आता त्यांनी उत्तर दिलं आहे. जेव्हा तुम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त वरळीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली, तर हा निर्णय नेमका कधी झाला होता? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला, दरम्यान या प्रश्नाला उत्तर देताना सचिन आहिर यांनी अतिशय सावध उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले आहिर?
‘काही गोष्टी असतात त्या गोष्टींना काही राजकीय संकेत असतात, किंवा नियम असतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टी अशा जाहीर व्यासपीठावर बोलायच्या नसतात. मात्र एक गोष्ट नक्की आहे, की हे फार आधीपासून काहीही ठरलेलं नव्हतं. अनेकांनी तर असंही म्हटलं की, लोकसभेचे खासदार फोडले म्हणून त्यांना बक्षिस देण्यात आलं. परंतु असं काही घडलं नव्हतं ही काही दिवसांपूर्वीची चर्चा होती, असं यावेळी आहिर यांनी म्हटलं आहे.’
दरम्यान एक दिवस असा आला की अचानक सचिन आहीर यांनी महायुतीकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरला, आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हे नेमक कधी ठरलं होतं? आणि निर्णय कधी झाला? ‘असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, असं काही नव्हतं की फार महिने चर्चा चालली आहे. काही आठवडे चर्चा चालली अशातला काही भाग नव्हता. आपल्या सर्वांना माहिती आहे की, उपसभापतीपदाची निवडणूक ही अधिवेशनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होते. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही इच्छा प्रकट केली की तुमच्यासारखी लोक आमच्या पक्षातून चांगल्या पदावर जाऊन त्यांनी सामाजिक कार्य केलं पाहिजे.
श्रीकांत शिंदे यांनी देखील म्हटलं. मी पहिल्यांदा खुलासा करतो की मुळातच आम्ही शिवसेना पक्षातून निवडून आलो आहोत. सभापतीपद हे कुठलंही राजकीय पद नसतं. सभापती पद हे असं पद आहे की, विधान परिषदेचे जे सदस्य आहेत, ते कोणालाही अनुमोदन त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी इच्छा प्रगट केल्यानंतर पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी दाखल केली, आणि त्या माध्यमातून उपसाभापतीपदाची निवड बिनविरोध झाली. विरोधी पक्षाने देखील त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली, असं यावेळी अहिर यांनी म्हटलं.