
गेल्या चार दिवसापासून कोकण किनारपट्टीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अति मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाबरोबरच प्रचंड वारे वाहत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. उरणच्या जेएनपीटी बंदरालाही चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळात कंटेनरसह तीन कामगारच उडून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झालं आहे.
जेएनपीएटी बंदरातील न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनलला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून जहाजावरील कंटेनर काढण्यासाठी गेलेले तीन कामगार कंटेनरसह उडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या तीन कामगारातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. एवढी मोठी घटना घडल्या नंतरही आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर सुविधा उपलब्ध न झाल्याने कामगार वर्गात नैराश्ययाचे वातावरण पसरले आहे.
जनजीवन विस्कळीत
उरण तालुक्यातील जनतेला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तालुक्यात हाहा:कार माजला आहे. संपूर्ण तालुक्याला पाण्याने वेढले असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यात सोमवारी सकाळी जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनल येथील जहाजवरून चक्रीवादळात कंटेनर उडाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात जहाजावरील कंटेनर काढण्यासाठी गेलेले तीन कामगार उडाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
शाळाना सुट्टी
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील काही भागांतील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. पनवेल, अलिबाग, उरण, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर आणि म्हसळा या सात तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास नको
रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे दक्षिण रायगडमध्ये सतर्कता कायम आहे. दरड कोसळल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही धोका नसून सर्व नागरिक सुरक्षित आहेत, असंही गोगावले यांनी म्हटलं आहे.