
आमिर खान-गौरी स्प्रॅट, सलमान – शाहरुख खानImage Credit source: Instagram
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने हे खऱ्या आयुष्यात सिद्ध केलं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मात्र यामध्ये आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव कुठेच दिसले नाहीत. इतकंच नव्हे तर इंडस्ट्रीतील आमिरचे जिवलग मित्र सलमान खान आणि शाहरुख खानसुद्धा या लग्नाला उपस्थित नव्हते.
लग्नाआधी आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी त्याच्यासोबत आणि गौरीसोबत दिसल्या होत्या. इतकंच नव्हे तर या सर्वांना एकाच गाडीतून प्रवास करतानाही पाहिलं गेलं. त्यामुळे आमिरच्या तिसऱ्या लग्नाला रिना आणि किरणसुद्धा उपस्थित असतील, असा अंदाज होता. आमिर आणि गौरीच्या लग्नाला त्यांची सर्व मुलं उपस्थित होती. जुनैद, आयरा आणि आझाद या लग्नात सहभागी झाले होते. याशिवाय इंडस्ट्रीतील परिचयाचे चेहरेसुद्धा या लग्नाचे साक्षीदार बनले होते. मात्र रिना दत्ता आणि किरण राव यांनी स्वत:ला आमिरच्या तिसऱ्या लग्नापासून दूर ठेवलं होतं.
पहा लग्नाचा फोटो-
आमिरच्या लग्नात चाहत्यांना फक्त रिना आणि किरण यांचीच कमतरता जाणवली नाही, तर जिवलग मित्र सलमान खान आणि शाहरुख यांच्या अनुपस्थितीनेही सर्वांचं लक्ष वेधलं. सलमान आणि शाहरुख हे आमिरच्या प्रत्येक सुखदु:खात त्याच्यासोबत होत. आमिरने सर्वांत आधी या दोघांशीच त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली होती. मात्र आमिर आणि गौरीच्या खास दिवशीच दोघंही गैरहजर राहिले. कदाचित हे दोघं त्यांच्या कामात किंवा शूटिंगमध्ये व्यस्त असतील, असंही म्हटलं जात आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट हे दोघं एकमेकांना गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होते. 2024 मध्ये बंगळुरूमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली आणि या भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं. हळूहळू आमिर आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर ते मुंबईत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. गौरीचंही हे दुसरं लग्न असून पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. आमिर आणि गौरीने विशेष विवाह कायद्याअंतर्गत नोंदणी पद्धतीने लग्न केलं.