
बेस्टच्या भरधाव बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने १४ गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी एस.व्ही. रोड येथे घडली आहे. या प्रकरणात एकूण १४ वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत ६ ते ८ जण जखमी झाल्याने त्यांना कूपर रुग्णालयास विविध रुग्णालयात दाखल केले आहे. ही बस मिल्लत नगरहून अंधेरी बसस्थानकाकडे जात असताना सीझर रोडजवळ हा विचित्र अपघात घडला आहे. बस चालक आणि वाहकाला चौकशीसाठी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या अपघातात ९ रिक्षा, ४ कार आणि १ तीन चाकी टेम्पोचे नुकसान झाले आहे.
टिळक नगर ते अंधेरी स्थानक (पश्चिम ) बेस्ट बस क्रमांक २४२ या मार्गावरील बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने अंधेरी येथील १४ गाड्यांना धडक दिल्याने अनेक सहा ते आठ जण यात जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत ९ रिक्षांचे चार कारचे आणि एका तीन चाकी टेम्पोचे नुकसान झाल्याची माहिती उघड झाली आहे. या बेस्ट चालक आणि वाहकाला चौकशीसाठी डी.एन.नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यात बेस्टच्या चालकांच्या चुकीमुळे अनेक अपघात घडले आहेत. त्यातील बहुतांशी अपघात कंत्राटी चालकांच्या चुकीमुळे घडले आहेत. ही बस देखील वेटलिज बस असून सांताक्रुझ डेपोतील मातेश्वरी या कंत्राटदाराची आहे. तसेच या प्रकरणातील चालक साहिल सावंत ( ३० ) आणि वाहक किरण चव्हाण ( ३५ ) हे दोघेही कंत्राटी कामगार आहेत.
रिव्हर्स घेताना पादचाऱ्याला चिरडले
नुकताच भांडुप कोकण नगर येथे बेस्टची मोठी बस रिव्हर्स घेताना एका प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावल्याची घटना ८ जुलै रोजी घडली होती. प्रवाशांनीच या बसला धक्का मारुन पुढे नेल्याने या पादचारी प्रवाशाचे प्राण सुदैवाने बचावले होते. मंगतराम पेट्रोल पंप येथे रस्ता अरुंद असल्याने येथे मोठ्या आकाराच्या बसना मागे वळवताना अडचण होते अशी तक्रार बसचालकांनी अनेकदा केली आहे.