
देशभरात चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीने विविध शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा संबंधित मुद्द्यांवर आवाज उठवत आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मोठी घोषणा करत येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी व्यापक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाच्या पुढील टप्प्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या पुण्यातही आंदोलन सुरू असून त्यात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आंदोलनाबाबतची सविस्तर भूमिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना दीपके यांनी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. “कॉकरोच जनता पार्टी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहील, असे अनेकांना वाटत होते. मात्र जंतर-मंतरवरील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण मैदान भरून टाकले,” असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, अभिजित दीपके यांनी देशभरातील पालकांनाही आवाहन केले. “तुमची मुलं सरकारला प्रश्न विचारत असतील किंवा सामाजिक-राजकीय विषयांवर मत व्यक्त करत असतील, तर त्यांना थांबवू नका. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे,” असे ते म्हणाले.
तसेच, “एखाद्या व्यक्तीचा आवाज दाबता येईल, पण लाखो तरुण एकत्र आले तर त्यांचा आवाज दाबणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहनही त्यांनी केले. पुण्यातील आगामी आंदोलन हे जंतर-मंतरवरील आंदोलनापेक्षाही मोठे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात्मक भूमिकेमुळे शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले असून, 20 जूनच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.