
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक विधान करत बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. त्यांच्या या या टिप्पणीनंतर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ चं नाव सध्या प्रचंड गाजतंय. या पक्षाने इंटरेनटवरीही धूमाकळू माजवला असन पक्षाच्या इंस्टाग्राम पेजने फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत अनेक मोठ्या राजकीय पक्षांना मागे टाकले आहे. या पेजचे 1.4 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच कारणामुळे सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, हा कोणताही खरा राजकीय पक्ष नसून, गमतीशीर व्हिडिओ आणि मीम्स शेअर करणारे एक सोशल मीडिया पेज आहे.
या पेजवरील कंटेंटची शैली इतकी वेगळी आणि मनोरंजक आहे की लोक या पेजशी झपाट्याने जोडले जात आहेत. इंटरनेट युजर्सकडून या पेजचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून बरेच जण तर याला ‘सर्वात मनोरंजक पार्टी’ असंही म्हणताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या युगात, जिथे मोठे नेते आणि राजकीय पक्ष लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात, तिथे झुरळाच्या थीमवर आधारित एक पेज लाखो लोकांच्या पसंतीस उचरलं आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ नेमकी आहे काय आणि ती इंटरनेटवर इतक्या वेगाने व्हायरल का होत्ये, जाणून घेऊया.
19 मिलियन फॉलोअर्ससह बनलं इंटरनेट सेन्सेशन
या इंस्टाग्राम पेजवरील फॉलोअर्सची संख्या 1 कोटींच्या वर पोहोचली आहे. फॉलोअर्सच्या या मोठ्या संख्येने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, कारण हे पेज अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया खात्यांपेक्षा खूप पुढे गेलं आहे. भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या, 143 वर्षे जुन्या काँग्रेसलाही या पक्षाने मागे टाकले आहे, काँग्रेसचे यापूर्वी इंस्टाग्रामवर 13.3 मिलियन फॉलोअर्स होते. तर सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपलाही या पक्षाने पछाडलं आहे. भाजपच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या (@bjp4india,) सुमारे 88 लाख फॉलोअर्स आहेत.
या पेजवरील मजकूर हलकाफुलका आणि मनोरंजक असल्याचं सोशल मीडियायुजर्सचं म्हणणं आहे. सध्याच्या तणावपूर्ण जीवनात लोकांना असा मजकूर अधिकाधिक आवडू लागला आहे. याचे व्हिडिओ छोटे, मजेशीर आणि समजायला सोपे असतात. त्यामुळेच लोक ते वेगाने शेअर करत आहेत. गेल्या काही वर्षांत मीम संस्कृती ( Meme Culture ) झपाट्याने वाढली आहे. इंस्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरील मनोरंजक कंटेंट लोकांना अधिकाधिक आवडू लागला आहे. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा याच ट्रेंडचा एक भाग मानला जात असून त्याचा कंटेंट तरुणांमध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे.
कसा झाला CJP चा उदय, कोण आहे संस्थापक ?
अभिजीत दिपके हे Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक असून तरुण आणि बेरोजगारीच्या वादानंतर त्यांनी ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. खरंतर, गेल्या आठवड्यात 15 मे रोजी एका सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुणांची झुरळांशी केलेली तुलना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली, ज्यामुळे तरूणांमध्ये संताप उसळला. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी व्यंग्य आणि मीम्सचा वापर करून ‘कॉकरोच जनता पार्टी’ ( Cockroach Janta Party ) नावाची सोशल मीडिया चळवळ सुरू केली.
अशी टिप्पणी देशाच्या सरन्यायाधीशांकडून आली, या गोष्टीचे लोकांना सर्वाधिक दुःख झाल्याचं ते म्हणाले होते. सुरुवातीला, हे फक्त एक मीम पेज होते, पण लवकरच ते बेरोजगारी, पेपरफुटी, तरुणांचा संताप आणि व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारी एक ऑनलाइन मोहीम बनली. स्वतःला तरुणांचा पक्ष म्हणवणाऱ्या या पेजने अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळवले आहेत आणि ते इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल झालं आहे.