
चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला आहे. चेन्नईने मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे माफक आव्हान एकतर्फी फरकाने सहज पूर्ण केलं. चेन्नईने 11 बॉलआधी आव्हान पूर्ण करत विजय साकारला. चेन्नईने 18.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. चेन्नईचा हा या मोसमातील एकूण चौथा आणि मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला.
मुंबईची बॅटिंग
हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र नमन धीर याचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली केली. मुंबईसाठी फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. नमनने सर्वाधिक धावा केल्या. नमनने 37 बॉलमध्ये 154.05 च्या स्ट्राईक रेटने 57 रन्स केल्या. नमनने या दरम्यान 3 षटकार आणि 3 चौकार लगावले. रायन रिकेल्टन याने 24 चेंडूत 37 धावांचं योगदान दिलं. सूर्यकुमार यादवने 21 रन्स केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याने 23 बॉलमध्ये 18 रन्सची संथ आणि सुमार खेळी केली. तर इतरांना 10 हा आकडाही गाठता आला नाही.
चेन्नईसाठी अंशुलं कंबोज याने 3 विकेट्स मिळवल्या. नूर अहमद याने दोघांना बाहेर पाठवलं. तर जेमी ओव्हरटन आणि रामकृष्ण घोष या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
चेन्नईचा दणदणीत विजय
त्यानंतर चेन्नईच्या पहिल्या 4 फलंदाजांनीच विजयी धावा पूर्ण केल्या आणि 2 गुणांची कमाई केली. संजू सॅमसन याने 11 धावा केल्या. तर उर्विल पटेल याने 24 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड इम्पॅक्ट प्लेअर कार्तिक शर्मा या जोडीने चेन्नईला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी 75 बॉलमध्ये नॉट आऊट 98 रन्सची पार्टनरशीप केली.
स्कोअरकार्ड
ऋतुराजने 48 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 67 रन्स केल्या. तर कार्तिकने अर्धशतक करुन इतर फलंदाज असूनही त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाठवण्याचा टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य ठरवला. कार्तिकने 40 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 54 रन्स केल्या. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गजनफर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मुंबईचा हा या मोसमातील सातवा पराभव ठरला.