
IPL 2026: महेंद्रसिंह धोनीच्या या चुकीचा चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका? झालं असं की…
Image Credit source: IPL/BCCI
आयपीएल 2026 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला. या सामन्यात पराभव झाला आणि चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित संपुष्टात आलं. खरं तर पाचवेळा चॅम्पियन्श ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फार अपेक्षा होत्या. मात्र गेल्या काही पर्वात चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. 2021 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर संघाची जेतेपदाची झोळी रिती आहे. आता चेन्नई सुपर किंग्सचं या पर्वात काय चुकलं? कोणत्या खेळाडूने निराश केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहे. या पराभवाची कारणमीमांसा करताना एक बाब अधोरेखित झाली की संघ एका खेळाडूशिवाय खेळत होता. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर महेंद्रसिंह धोनी होता.
चेन्नई सुपर किंग्सला पाचवेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीकडून या पर्वात फार अपेक्षा होत्या. या पर्वात खेळून संघाच्या कामगिरीत हातभार लावेल असं वाटलं होतं. पण स्पर्धेच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत एक कोडं राहिलं. मागच्या पर्वात महेंद्रसिंह धोनीने संघाची धुरा सांभाळली होती. कारण ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली आणि स्पर्धेला मुकला होता. पण या पर्वात ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनी हे दोघंही संघात होते. ऋतुराज गायकवाडच्या हाती धुरा होती. पण धोनी एकही सामना खेळला नाही. दुखापतीमुळे धोनी या स्पर्धेत खेळला नाही. स्पर्धेच्या सुरूवातीला त्याच्या पोटरीत दुखापत झाल्याने खेळला नाही. त्यानंतर सर्वकाही ठीक होतं. मग त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे शेवटपर्यंत खेळला नाही.
चेपॉक स्टेडियममधये शेवटचा सामना खेळेल अशी चर्चा होती. कारण धोनी मैदानात उपस्थित होती. पण तेव्हा फोटोग्राफीपुरता मैदानात उतरला. त्यानंतर गुजरातविरुद्ध शेवटचा सामना खेळेल असं बोललं जात होतं. तेव्हा रांचीला परतला. चेन्नई सुपर किंग्सने धोनीवर अवलंबून राहून चूक तर केली नाही ना? कारण त्याला दुखापत झाल्याने त्याच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली नाही. या पर्वात त्याची दुखापत कायम राहिली. या स्पर्धेत अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले, पण त्यांची रिप्लेसमेंट त्या त्या संघांना मिळाली. पण धोनीला रिप्लेस केलं गेलं नाही. खरं तर धोनीला आराम दिला असता तरी तो संघासोबत राहू शकला असता. तर एका खेळाडू संघात आला असता तर संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करता आला असता. पण तसं झालं नाही.