Headlines

Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?

Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?
Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?


युट्यूब किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स स्क्रोल केले, तर तुम्हाला अनेकदा खास भारतीय शैलीत, हातात लाकडी ग्लोब किंवा नकाशा घेऊन प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्दे अत्यंत चटकदारपणे समजावून सांगणारा एक चेहरा दिसेल. हा चेहरा आहे पाटण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षक खान सरांचा. आपल्या अनोख्या आणि विनोदी शैलीने देशभरात शिक्षणाचा संदेश पसरवणाऱ्या खान सरांना खरंतर कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण सध्या ते देशभरात त्यांच्या कोणत्याही क्लास किंवा व्हिडीओमुळे नाही, तर त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत आले आहेत. या खळबळजन घटनेच्या पार्श्वभूमीवर लोक पुन्हा एकदा इंटरनेटवर त्यांच्याबद्दल सर्च करत आहेत. या खान सरांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि ते कोणते विषय शिकवतात, त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

कोचिंग सेंटरच्या बाहेर गोळीबार

मंगळवारी पाटण्यातील मुसल्लापूर हाटजवळ खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर गोळीबार झाला. या घटनेत एक सुरक्षारक्षक जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसांनी मोठी चौकशी सुरू केली आहे. मुसल्लापूर हाटजवळ खान सरांची प्रतिष्ठित कोचिंग संस्था आहे. त्याठिकाणी झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून तिथे शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

खान सरांना होऊ शकते अटक

या अंदाधुंद गोळीबारामागे कोण होतं, कोचिंग इन्स्टिट्यूट किंवा खान सरांना थेट लक्ष्य करण्यात आलं होतं की वैयक्तिक वैमनस्य किंवा खंडणीच्या प्रकरणामुळे ही घटना घडली, याचा तपास विशेष पोलीस पथक करत आहे. या हल्ल्यामागील सूत्रधारांना ओळखण्यासाठी पोलीस आता प्रत्यक्षदर्शींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. याप्रकरणाने आता एक नवीन वळण घेतलं असून व्हायरल झालेल्या गोळीबाराच्या व्हिडीओच्या तपासानंतर, पाटणा पोलिसांनी खान सरांविरोधात शस्त्र कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. खरंतर खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील कथित हल्ला आणि गोळीबारप्रकरणी सुरुवातीला ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांना अटक करण्यात आली होती. मात्र सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलली आहे.

दोन कोचिंग सेंटरमधील वाद विकोपाला

व्हायरल व्हिडीओमध्ये खान सरांचा एक बॉडीगार्ड गोळी झाडताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर पोलिसांनी खान सरांच्या दोन बॉडीगार्ड्सना अटक केली. त्यांची शस्त्रे न्यायवैद्यक विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. या संपूर्ण वादाची सुरुवात बिहार पोलीस भरतीच्या निकालानंतर झाली. निकालानंतर खान ग्लोबल स्टडीजचे फैसल खान आणि ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद या दोघांनी दावा केला की त्यांच्या संबंधित संस्थांमध्ये सर्वाधित यशस्वी विद्यार्थी आहेत. दोन्ही बाजूंनी यशस्वी उमेदवारांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले आणि पाटण्यात मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स आणि बॅनर्स लाव्यात आले. याच काळात खान सरांच्या कर्मचाऱ्यांनी ज्ञान बिंदू कोचिंग सेंटरच्या बोर्डवर आपला बॅनर लावल्याने वादाची ठिणगी पडली. त्यानंतर 2 आणि 3 जूनच्या रात्री दोन्ही गटांमध्ये तीव्र हिंसाचार, तोडफोड, दगडफेक आणि गोळीबार झाला.

सुरुवातीला फैसल खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला करून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ज्ञान बिंदूचे संचालक रोशन आनंद यांना अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ ज्ञान बिंदूच्या विविध कोचिंग सेंटरमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालं. या नवीन व्हिडीओमध्ये रोशन आनंद यांची माणसं नाही तर खान सरांचे बॉडीगार्ड उघडपणे गोळीबार करताना दिसत होते. व्हिडीओ समोर येताच पाटणा पोलिसांनी खान ग्लोबल स्टडीज कॅम्पसमधून फैसल खान यांच्या दोन्ही बॉडीगार्डना अटक केली. मुलांचं भविष्य घडवण्याचा दावा करणाऱ्या दोन प्रमुख कोचिंग संस्थांमधील वाद आता पोलीस आणि न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.

खान सरांच्या पदव्या

खान सर हे व्हिडीओमध्ये फक्त सामान्य ज्ञानाबद्दल बोलताना दिसतात, त्यामुळे ते कदाचित सामान्य कुटुंबातून आले असतील, असं अनेकांना वाटतं. मात्र त्यांच्या अधिकृत प्रोफाइल आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, खान सरांची शैक्षणिक पार्श्वभूमी भक्कम आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया इथं जन्मलेले फैसल खान उर्फ खान सर उच्च शिक्षणासाठी प्रयागराज इथं आले. त्यांनी प्रतिष्ठित अलाहाबाद विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आधी विज्ञान शाखेची पदवी (BSC) मिळवली. त्यानंतर त्याच विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी (MSC) पूर्ण केली.

विज्ञान शाखेचा अभ्यास करूनही खान सर समाधानी नव्हते. त्यांनी कला शाखेकडे वळून अलाहाबाद विद्यापीठातून भूगोलात एम. ए. पदवी मिळवली. यामुळेच जेव्हा ते नकाशावर देशाच्या आणि जगाच्या सीमा समजावून सांगतात, तेव्हा या विषयावरील त्यांचं प्रभुत्व स्पष्टपणे दिसून येतं.

खान सर काय शिकवतात?

खान सरांचे डिजिटल प्लॅटफॉर्म, खान जीएस रिसर्च सेंटर किंवा त्यांचे खान ग्लोबल स्टडीज अॅप पाहिल्यास लक्षात येतं की ते कोणत्याही एका विषयाचे शिक्षक नाहीत. ते प्रामुख्याने सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पारंगत आहेत.

भूगोल- भुगोलात एम. ए. केल्यामुळे भारतीय नकाशा, जागतिक नकाशा आणि भू-राजकारण हे त्यांचे सर्वांत मजबूत विषय मानले जातात.

इतिहास आणि राज्यशास्त्र- देशाचं संविधान, एखादी मोठी ऐतिहासिक लढाई यांसारखे विषय ते एखाद्या गोष्टीप्रमाणे समजावून सांगतात.

विज्ञान आणि चालू घडामोडी- विज्ञान शाखेत पदवी मिळवलेले खान सर क्लिष्ट वैज्ञानिक संज्ञा आणि महत्त्वाचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्दे हे भोजपुरी किंवा हिंदी भाषेचा वापर करून समजावून सांगतात. त्यांची संस्था विद्यार्थ्यांना युपीएससी, बीपीएससी, रेल्वे आणि एसएससी यांसारख्या परीक्षांसाठी तयार करते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *