
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 69 व्या आणि प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय निर्णायक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर वानखेडे स्टेडियमध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर राजस्थानला 200 पार पोहचता आलं. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. त्यामुळे आता राजस्थान हा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट मिळवणार की मुंबई आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करणार? हे 20 ओव्हरनंतर स्पष्ट होईल. दोन्ही संघांचा हा 14 वा आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे.
पहिल्या डावाचा सविस्तर आढावा
मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सला बॅटिंगसाठी बोलावलं. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल सलामी जोडी राजस्थानला आक्रमक सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली. दोघांनी संयमी सुरुवात केली. दोघेही गिअर बदलतील असं वाटलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी सलामी जोडीला झटपट आऊट केलं. विल जॅक्स याने यशस्वी जैस्वाल याला 27 रन्सवर आऊट करत राजस्थानला पहिला झटका दिला. त्यानंतर दीपक चाहर याने वैभव सूर्यवंशी याला 4 रन्सवर आऊट करत राजस्थानला दुसरा झटका दिला. त्यामुळे राजस्थानची 4.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 33 अशी स्थिती झाली.
त्यानंतर शुबम दुबे याचा अपवाद वगळता इतर 7 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र ध्रुव जुरेल, दासून शनाका आणि जोफ्रा आर्चर या तिघांनी फटकेबाजी करुन निर्णायक धावा जोडल्या. तसेच इतर फलंदाजांनीही छोटेखानी मात्र महत्त्वाच्या धावा जोडल्या.
ध्रुव जुरेल याने राजस्थानसाठी सर्वाधिक 38 धावा केल्या. जुरेलने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर ठोकले. दासुन शनाका याने 29 धावांचं योगदान दिलं. तर जोफ्रा आर्चर याने अखेरच्या टप्प्यात फक्त 15 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 32 रन्स जोडल्या. त्या व्यतिरिक्त एकालाही 20 पार पोहचता आलं नाही.
लाईव्ह स्कोअरकार्ड
कॅप्टन रियान पराग याने 14, डोनोवर फेरेरा 18 आणि शुबम दुबे याने 5 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा आणि नांद्रे बर्गर हे दोघे नाबाद परतले. जडेजाने 19 आणि बर्गरने 10 धावा जोडल्या. मुंबईसाठी शार्दूल ठाकुर आणि दीपक चाहर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर विल जॅक्स, अल्लाह गझनफर आणि कॉर्बिन बॉश या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.