
गेल्या काही दिवसांपासून देशात नीट पेपरफुटी प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला नाशिक आणि नंतर लातूर-नांदेड येथे सापडले. सध्या लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना नीट युजी (NEET UG) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता हा संपूर्ण घोटाळा समोर आणण्यात राजस्थानचे शिक्षक शशिकांत सुथार यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी स्वतः समोर येत या संपूर्ण घटनाक्रमाचा थरारक खुलासा केला आहे.
पेपरफुटीचा सुगावा कसा लागला?
शिक्षक शशिकांत सुथार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी परीक्षा संपल्यानंतर त्यांनी नीटची प्रश्नपत्रिका तपासली. त्याच वेळी त्यांच्या घरमालकाने त्यांना व्हॉट्सॲपवर आलेली ‘रसायनशास्त्र’ (Chemistry) या विषयाची एक पीडीएफ (PDF) दाखवली. सुथार यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि ती पीडीएफ पडताळून पाहिली असता, पीडीएफमधील तब्बल ४५ प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते. काही वेळातच त्यांना ‘जीवशास्त्र’ (Biology) विषयाचीही अशीच पीडीएफ मिळाली, ज्यातील तब्बल 90 प्रश्न मुख्य प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होते. हा प्रकार उघडकीस येताच सुथार यांनी तातडीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), सीबीआय (CBI) आणि शिक्षण मंत्रालयाला ईमेलद्वारे याची माहिती दिली. यावर सरकारनेही तातडीने पावले उचलत कारवाई सुरू केली.
सीबीआयला चकवणारी मनीषा मांढरेची ‘सुपर मेमरी’ ट्रिक!
या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा मांढरे सध्या १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीत आहे. मात्र, तिच्या चौकशी दरम्यान तपास यंत्रणांना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनीषा मांढरेची स्मरणशक्ती अतिशय तीव्र आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ एकच विषय शिकवत असल्यामुळे, तिने परीक्षेचे सर्व प्रश्न मनातल्या मनात तोंडपाठ केले होते. तिने कोणतेही प्रश्न कुठेही लिहून न ठेवल्याने किंवा डिजिटल पुरावा न सोडल्याने सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
या प्रकरणातील दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मांढरेचे नाव घेतले होते, ज्याच्या आधारे सीबीआयने तिला अटक केली. सध्या सीबीआयकडे तिच्याविरुद्ध कोणताही ठोस लिखित किंवा डिजिटल पुरावा नसून, पथक पुराव्यांचा कसून शोध घेत आहे.
मुख्य सुत्रधार शिवराज मोटेगावकरचा ‘मास्टरप्लॅन’
सीबीआयच्या तपासात समोर आले आहे की, नीट पेपरफुटीचा हा कट शिवराज मोटेगावकर याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रचला होता. मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासेसमध्ये काम करणाऱ्या पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची ‘एनटीए’च्या (NTA) प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. कुलकर्णी यांनी ‘केमिस्ट्री’ आणि मनीषा मांढरे यांनी ‘बायोलॉजी’चे प्रश्न फोडून ते मोटेगावकरपर्यंत पोहोचवायचे, असे ठरले होते. प्रदीर्घ अनुभवामुळे कुलकर्णी आणि मांढरे या दोघांनी प्रश्नपत्रिका तयार होतानाच त्यातील प्रश्न तोंडपाठ केले आणि नंतर ते हाताने लिहून मोटेगावकरला पाठवले.
मोटेगावकरने या प्रश्नांची पीडीएफ बनवून स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवली आणि पैशांच्या बदल्यात ती विकली. ३ मे रोजी परीक्षा संपताच पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. मात्र, सीबीआयने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर (Recover) केला आणि मोटेगावकरच्या मुसक्या आवळल्या.