Headlines

NEET-UG 2026 परीक्षेचा पेपर नक्की कुठे फुटला? नाशिक ते राजस्थान… नेमकं काय घडलं?

NEET-UG 2026 परीक्षेचा पेपर नक्की कुठे फुटला? नाशिक ते राजस्थान… नेमकं काय घडलं?
NEET-UG 2026 परीक्षेचा पेपर नक्की कुठे फुटला? नाशिक ते राजस्थान… नेमकं काय घडलं?


वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा सध्या पेपरफुटीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सध्या संपूर्ण देशभरात नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्र सरकारने सीबीआयकडे (CBI) सूत्रे सोपवल्यानंतर आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या कारवाई केल्या जात आहेत. आता नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे मूळ महाराष्ट्रातील नाशिक येथील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली असून सीबीआयकडून वेगाने तपास केला जात आहे.

नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये रचला गेला कट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील ज्या प्रेसमध्ये नीटच्या प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या, तिथे काम करणाऱ्या शुभम खैरनार नावाच्या व्यक्तीने आपल्या पदाचा गैरवापर केला. त्याने छपाईच्या प्रक्रियेदरम्यान प्रश्नपत्रिका चोरली. त्यानंतर मग पेपरफुटीचे लोण राज्यात पसरले.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम खैरनारने प्रश्नपत्रिका चोरल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने एक क्लृप्ती लढवली होती. त्याने मूळ प्रश्नपत्रिका थेट न विकता त्यावर अंदाजित प्रश्नपत्रिका (Guess Paper) असे लेबल लावले होते. जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मात्र, परीक्षेनंतर तपासणी केली असता, या अंदाजित संचातील १२० हून अधिक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचे आढळले.

पुण्यात झाला पहिला व्यवहार

या पेपरफुटीचा पहिला आर्थिक व्यवहार पुण्यामध्ये झाला. त्यानंतर दलाल आणि एजंटांच्या माध्यमातून हे जाळे राजस्थानमधील सीकरपर्यंत पोहोचले. सीकर हे वैद्यकीय शिक्षणाचे केंद्र असल्याने तिथे अनेक विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका पुरवण्यात आली. धक्कादायक म्हणजे, एका आरोपीने आपल्या मुलाला ही प्रश्नपत्रिका आधीच दिली होती.

त्यासोबतच आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका राजस्थान, दिल्ली, बिहार आणि आंध्र प्रदेशसह १० राज्यांत पसरवली. ही माहिती परीक्षेच्या तब्बल तीन आठवडे आधीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयचे पथक सध्या जयपूरमध्ये असून राजस्थान पोलिसांच्या एसओजी (SOG) विभागासोबत समन्वय साधून तपास करत आहे. डिजिटल चॅट्स, टेलिग्राम नेटवर्क आणि छपाई केंद्रातील संशयास्पद हालचालींची कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी येत्या काळात आणखी मोठी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *