
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. विकासकामांना गती देण्यासाठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे या खासदारांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, पक्षप्रवेशानंतर अवघ्या एका दिवसात ओमराजे निंबाळकर यांच्या एका वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. महायुतीत सहभागी झाल्यानंतरही जिल्ह्यातील राजकीय संघर्ष कायम राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर म्हणाले, “महायुतीत आलो असलो तरी माझ्या जिल्ह्यातील संघर्ष थांबणार नाही. राज्यस्तरावर काय घडेल हे मला माहीत नाही, मात्र जिल्ह्यात मांडीला मांडी लावून बसणे मला शक्य नाही.” तसेच त्यांनी राणा पाटील यांच्याकडून एकही मत नको असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केल्याचे समजते.
खासदार निधीच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केल्याची माहिती आहे. “2019 ते 2024 या कालावधीतील माझ्या खासदार निधीची माहिती तपासायला हवी होती. माझ्या कार्यकाळातील एकही रुपया शिल्लक राहिलेला नाही. खासदारांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो आणि माझा कार्यकाळ अद्याप संपलेला नसताना निधीबाबत प्रश्न उपस्थित होणे योग्य नाही,” असे त्यांनी म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यावेळी भविष्यातील राजकीय भूमिकेबाबतही त्यांनी सूचक विधान केले. “मी न्याय मिळावा म्हणून राजकारणात आलो आहे. जर न्याय मिळाला नाही, तर माझी पुढील भूमिका सर्वांना दिसेल. 2029 मध्ये जागा मिळाली नाही तर मी अपक्ष निवडणूक लढवण्याचाही विचार करू शकतो,” असे त्यांनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर या विषयावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर परिणाम होणार का, तसेच ते भविष्यात स्वतंत्र भूमिका घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
दुसरीकडे, सहा खासदारांच्या शिवसेना प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. “सहाचे सहा खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील आणि विजयी होतील,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला होता.