Headlines

Sharad Pawar | नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…

Sharad Pawar | नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…
Sharad Pawar | नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचा उल्लेख करत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचाही उल्लेख केला. “आज अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पक्षाची जाहिरात पाहिली. विशेषतः टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरील जाहिरात पाहून आश्चर्य वाटले. अशा जाहिरातींसाठी मोठा खर्च लागतो, त्यामुळे मी कधी त्या मार्गाने गेलो नाही,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत पक्षाने सत्ता असो वा नसो, जनतेमध्ये राहून काम करण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे सांगितले. “अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात राहून जनतेसाठी काम करण्यात घालवला आहे. सत्ता असेल तर सत्तेत राहून काम करायचे आणि सत्ता नसेल तर लोकांमध्ये राहून काम करायचे, ही आमची भूमिका राहिली आहे,” असे पवार यांनी नमूद केले.

पंडित नेहरू यांच्या कार्याचा उल्लेख करताना शरद पवार म्हणाले की, “नेहरूंचा काळ, त्यांचे कर्तृत्व आणि देशासाठीचे योगदान लक्षात घेतले तर त्यांची तुलना कोणाशीही सहज करता येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला आणि अनेक वर्षे तुरुंगवासही भोगला.”

ते पुढे म्हणाले की, “स्वतंत्र भारताची पायाभरणी करण्यात नेहरूंचे मोठे योगदान आहे. आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळखले जातो, त्यामागे त्यांच्या संघर्षाची आणि नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा इतिहासाचा भाग असून तो विसरता येणार नाही.”

दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, नेहरू आणि मोदी यांच्या तुलनेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *