
गेल्या काही काळापासून भारत पर्यायी इंधनाचा पर्याय शोधत आहे. देशात आता आता कचऱ्यापासून इंधन तयार करण्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सध्याच्या E20 इंधनाचा इंजिनवर होणाऱ्या परिणामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे सरकार भविष्यातील इंधनाचे नवे चित्र मांडत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका दाव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. गडकरी यांच्या मते, येत्या काळात राजधानी दिल्लीतील बस पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रिकवर नव्हे, तर शहरातील कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर धावतील. याचा अर्थ जो कचरा सर्वात मोठी समस्या मानला जातो, तोच आता वाहनांसाठी इंधन ठरू शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले गडकरी?
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ‘येत्या काळात दिल्लीतील बस शहरातील कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर चालू शकतात. जर महापालिकेचा कचरा योग्य पद्धतीने वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली, तर त्यापासून हायड्रोजन तयार करता येईल आणि त्याच इंधनावर बस चालतील. ही केवळ कल्पना नसून हे पूर्णपणे शक्य आहे.
कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करण्याची तयारी
दिल्ली भाजपच्या युवा संमेलनात बोलताना गडकरी म्हणाले की, ‘महापालिकेचा कचरा प्रथम वेगवेगळा केला जाईल. त्यानंतर बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यापासून हायड्रोजन वायू तयार केला जाईल. भविष्यात दिल्लीतील बस याच हायड्रोजनवर धावतील. तसेच जग वेगाने अशा इंधनाकडे वाटचाल करत असून भविष्यात पाण्यापासूनही हायड्रोजन तयार करून वाहने चालवली जातील.’
माझे आतापर्यंतचे अंदाज चुकले नाहीत
पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटले की ‘हे कसे शक्य होईल, असा प्रश्न अनेकजण विचारतात. पण गेल्या 50 वर्षांत मी केलेले प्रत्येक भाकीत खरे ठरले आहे. त्यामुळे कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करून बस चालवण्याचे स्वप्नही लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.’
गडकरी यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘दिल्लीतील लँडफिल साइट्सवरील सुमारे 80 लाख टन कचऱ्याचा वापर आधीच एक्स्प्रेसवे उभारण्यासाठी करण्यात आला आहे. 2027 पर्यंत देशभरातील मोठमोठे कचऱ्याचे ढीग पूर्णपणे हटवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, त्यासाठी कचऱ्याचा संसाधन म्हणून वापर करण्यावर भर दिला जात आहे.’