
भारतात डिजिटल पेमेंट इतक्या वेगाने वाढत आहे की लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत आहे. अगदी विद्यार्थी सुद्धा आता दैनंदिन खर्चासाठी ऑनलाइन पेमेंट करत आहेत. त्यामुळे ही वाढती गरज लक्षात घेऊन पेटीएमने ‘पेटीएम पॉकेट मनी’ हे नवीन फीचर सुरू केले आहे. कंपनीने 18 मे रोजी जाहीर केले की, हे फीचर विशेषतः अशा तरूण मुलामुलींसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांचे अद्याप बँक खाते नाही.
कंपनीच्या म्हणण्यानुसार आता मुलं बँक खाते नसतानाही पेटीएम यूपीआयद्वारे पेमेंट करू शकतील. महत्त्वाचे म्हणजे, पालकांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे त्यांच्या मुलांच्या खर्चावर पूर्ण नियंत्रण असेल. ते खर्चाची मर्यादा निश्चित करू शकतील आणि प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवू शकतील. चला तर मग या पेटीएम पॉकेट मनी फीचरचा वापर आणि फायदे सविस्तर जाणून घेऊयात.
पेटीएम पॉकेट मनीचे फायदे
पेटीएम पॉकेट मनीमुळे पालक आपल्या मुलांसाठी महिन्याभराचे खर्चाची मर्यादा निश्चित करू शकतात. कुटुंबातील सदस्य NPCI च्या UPI सर्कलद्वारे आपल्या मुलांना जोडू शकतात आणि सर्व व्यवहार रिअल-टाइममध्ये पाहू शकतात. एकदा सक्रिय झाल्यावर मुले त्यांच्या मोबाईल फोनवरील पेटीएम ॲप वापरून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने दुकानांमध्ये UPI पेमेंट करू शकतील, ज्यामुळे त्यांना वारंवार पालकांकडे फोन मागण्याची गरज भासणार नाही.
एवढीच असेल पॉकेट मनीची मर्यादा
पेटीएमने यासाठी खर्चाची मर्यादा देखील निश्चित केली आहे. किशोरवयीन मुले दरमहा जास्तीत जास्त 15,000 खर्च करू शकतात. यामध्ये 5,000 पर्यंतची एकरकमी रक्कम भरता येईल. ही मर्यादा पालक किंवा कुटुंबातील सदस्याद्वारे निश्चित केली जाऊ शकते. कंपनीने सुरक्षेची खात्री करण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. हे फीचर सक्रिय झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांसाठी फक्त 500 रूपयांचे पेमेंट करता येईल. पहिल्या 24 तासांमध्ये 5,000 ची मर्यादा लागू होईल. यामुळे फसवणुकीचे व्यवहार किंवा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल.
याव्यतिरिक्त, पेटीएम स्पेंड समरी फीचर प्रत्येक पेमेंट आपोआप एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये दाखवते. यामुळे कुटुंबांना पैसे कुठे खर्च होत आहेत हे समजण्यास मदत होईल आणि मुलांना खर्चाचे व्यवस्थापन शिकण्यासही मदत होईल. गरज भासल्यास, पालक त्यांच्या पेटीएम UPI पिनचा वापर करून खर्चाची मर्यादा बदलू शकतात किंवा ही सेवा त्वरित बंदही करू शकतात. डिव्हाइस लॉकसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील यात समाविष्ट आहेत.
पेटीएम पॉकेट मनी कसे सेट करावे
Paytm पॉकेट मनी सक्रिय करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या फोनमधील Paytm ॲप अपडेट करा.
Paytm ॲप उघडून “To Mobile / Contact” या पर्यायावर जाऊन “पॉकेट मनी” वर टॅप करा.
ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला हे फीचर सक्रिय करायचे आहे, त्या व्यक्तीला निवडा. UPI QR कोड स्कॅन करा किंवा UPI आयडी टाका.
आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करा.
तुमचे बँक खाते निवडा, Paytm UPI पिन टाका आणि शेवटी, मासिक मर्यादा निश्चित करा.
त्यानंतर पॉकेट मनी मिळवणाऱ्या व्यक्तीला इनव्हिटेशन स्वीकारावे लागेल. जर ॲपमध्ये “पॉकेट मनी” हा पर्याय दिसत नसेल, तर तुम्हाला Paytm ॲपला नवीन वर्जनमध्ये अपडेट करावे लागेल.