
वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलात व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनरमध्ये प्रचंड गोळीबार झाला. एका संशयित आरोपीने अंदाधूंद गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती आणि जगातील सर्वोच्च बलाढ्य नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच हा गोळीबार करण्यात आला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनाही पत्नीसह पळ काढावा लागला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव कोल थॉमसन एलन आहे. तो दक्षिणी कॅलिफोर्नियाचा रहिवाशी असून उच्चशिक्षित आहे. कोल थॉमसनची संपूर्ण कुंडलीच जगासमोर आली आहे.
ट्रम्प आणि दिग्गज अधिकारी हिल्टन हॉटेलात उपस्थित होते. या ठिकाणी जगातील सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था तैनात होती. एवढी मोठी सुरक्षा भेदून एलन या ठिकाणी आला. त्याने गोळीबार केला. त्याला ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. सीबीएस न्यूजच्या दाव्यानुसार, अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं एलनने कबूल केलं आहे. त्याला ट्रम्पच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधायचा होता. त्याला सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
फायरिंगनंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने व्हाईट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचा दावा केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी या आरोपीची प्रोफाईल खंगाळून काढण्यास सुरुवात केली तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
शिक्षक आणि गेम डेव्हल्पर
सुरक्षा रक्षकांनी केलेल्या चौकशीत मोठे खुलासे झाले आहेत. तसेच एलनची प्रोफाईल पाहून सुरक्षा रक्षकांना धक्काही बसला आहे. सार्वजनिक नोंदीनुसार, एलन हा 31 वर्षाचा आहे. तो लॉस एंजिल्स येथील टॉरेंसचा रहिवाशी आहे. तो व्यवसायाने शिक्षक असून गेम डेव्हल्परही आहे.
एलनच्या लिंक्डिन प्रोफाईलनुसार, तो C2 एज्युकेशन वावाच्या ट्युशन कंपनीत पार्ट टाईम टीचर आहे. विशेष म्हणजे त्याला डिसेंबर 2024मध्ये टीचर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं, असं सोशल मीडिया पोस्टवरून दिसतंय.
किती शिकला?
एलनने 2017मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीयरिंगमध्ये पदवी घेतली आहे. गेल्या वर्षी त्याने कॅलिफोर्निया स्टेट यूनिव्हर्सिटी डोमिंगुएज हिल्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. त्यावरून तो अति उच्चशिक्षित असल्याचं स्पष्ट होतं आहे. प्राथमिक तपासानुसार, एलन राजकारणाशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे. फेडरल इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डनुसार, ऑक्टोबर 2024मध्ये एलनने कमला हॅरिस यांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 25 डॉलरची देणगी दिली होती.