Headlines

कोचीचा ‘हा’ मसालेदार सरबत उन्हाळ्यात तुमची पचनक्रिया सुधारेल, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

कोचीचा ‘हा’ मसालेदार सरबत उन्हाळ्यात तुमची पचनक्रिया सुधारेल, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
कोचीचा ‘हा’ मसालेदार सरबत उन्हाळ्यात तुमची पचनक्रिया सुधारेल, जाणून घ्या बनवण्याची पद्धत


उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी, आपण प्रत्येकजण योग्य प्रमाणात पाणी पित असतो. पण या व्यतिरिक्त आपलं शरीर आतून थंड राहण्यासाठी आपल्या आजी आणि आईने आपल्याला हायड्रेटेड आणि पोषित ठेवणाऱ्या अनेक उत्कृष्ट घरगुती आणि आरोग्यदायी पेयं बनवलेली आहेत. प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये विविध प्रकारचे सरबत बनवले जातात आणि प्रत्येक घराची स्वतःची पारंपरिक सरबत बनवण्याची पद्धत आहे. पण आज आपण केरळमधील कोचीच्या रस्त्यांवर लोकप्रिय झालेल्या एका सरबताविषयी जाणून घेणार आहोत. हे एक मसालेदार चवीचे आंबट-गोड सरबत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे एक मॉकटेल्स आहे.

आपण ज्या सरबताविषयी बोलत आहोत ते केवळ चविष्टच नाही, तर ते तुमची पचनक्रिया सुधारते, उष्माघातापासून तुमचे रक्षण करते आणि दमट उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम देते. चला तर मग जाणून घेऊयात की हे सरबत कसे बनवायचे आणि त्याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊयात.

कुलुक्की सरबताची रंजक कहाणी

आपण ज्या केरळ राज्यातील पेयाबद्दल बोलत आहोत, त्याला ‘कुलुक्की’ असे म्हणतात. हे येथील एक खूप लोकप्रिय स्ट्रीट ड्रिंक आहे, जे ‘शेकन लेमोनेड’ या नावानेही ओळखले जाते. मल्याळममध्ये ‘कुलुक्की’ म्हणजे शेक केलेले. हे पेय मूळचे केरळमधील उत्तरेकडील कोझिकोड शहराचे आहे, परंतु त्याची रेसिपी केरळची राजधानी कोची या शहरात लोकप्रिय झाली.

कोचीमधील ‘कूल बार’ म्हणजेच ज्यूसची दुकाने आणि रस्त्यावरील विक्रेत्यांनी ते बनवायला सुरुवात केली. अशाप्रकारे त्याला लोकप्रियता मिळाली. इतकेच नाही तर कोची उच्च न्यायालय जंक्शनजवळ असलेले ‘शाजिक्का’ म्हणजेच शाजीचे कुल्फी सरबत दुकान त्यांच्या ‘कुलुक्की सरबतासाठी खूप प्रसिद्ध आहे. चला तर मग, याची रेसिपी जाणून घेऊयात.

कुलुक्की सरबतासाठी लागणारे साहित्य

हे पेय बनवण्यासाठी तुम्हाला 1 ग्लास नारळाचे पाणी, 1 मोठे लिंबू, 1 हिरवी मिरची, 1 चमचा भिजवलेले सब्जा बी, 1.5 चमचा पिठीसाखर, 5-6 पुदिन्याची ताजी पाने, पुरेसे बर्फाचे तुकडे आणि चिमूटभर काळे मीठ लागेल. सरबत बनवण्याची पद्धत जाणून घ्या.

कुलुक्की सरबत रेसिपी

सर्वप्रथम तुम्हाला नारळाचे पाणी एका शेकरमध्ये किंवा हवाबंद बरणीत ओतून घ्या.

नारळाच्या पाण्यात पिठीसाखर, पुदिन्याची पाने , लिंबाचा रस आणि बर्फ मिक्स करा.

छान बुडबुडे येण्यासाठी सर्व मिश्रण किमान 15 सेकंद चांगले शेक करा.

आता एक सर्व्हिंग ग्लास घ्या. त्यात बर्फाचे तुकडे, सब्जा बिया, हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या), लिंबाच्या चकत्या टाका.
ग्लासात सर्व साहित्य टाकल्यानंतर तयार नारळाचे पाणी त्यात ओता. काळे मीठ घालून चमच्याने हलक्या हाताने मिसळा.

चविष्ट आरोग्यदायी सरबत

अशाप्रकारे तुमचे मसालेदार आंबट आणि गोड चवीचे स्वादिष्ट कुलुक्की सरबत तयार होते. नारळाचे पाणी, सब्जा बिया, लिंबू, काळे मीठ आणि हिरव्या मिरच्या यांसारखे घटक तुमची पचनक्रिया सुधारण्यास, उष्माघातापासून तुमचे संरक्षण करण्यास आणि त्वरित ऊर्जा देण्यास उपयुक्त ठरतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *