
Big Revolt in Samajwadi Party : सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्येही काहीतरी घडत असल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत उभी फूट पडणार आहे, असा दावा सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी) पक्षाचे अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओम प्रकार राजभर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार एसबीएसपी पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी समाजवादी पार्टीमध्ये मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला आहे. राजभर यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली. याच पोस्टमध्ये त्यांनी समाजवादी पार्टीत फूट पडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार समाजवादी पार्टीतील प्रमुख नेते रामगोपाल यादव यांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना एक पत्र पाठवलं आहे. रामगोपाल यादव हे अखिलेश यादव यांचे काका आहेत. या पत्रात नेमके काय आहे? रामगोपाल यादव यांनी खरंच अमित शाहा यांना पत्र दिलं आहे का? याविषयी ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल सोडून द्या. उत्तर प्रदेशमधील संपूर्ण समाजवादी पक्षच भाजपात सामील होण्यासाठी तयार बसला आहे, असा मोठा दावाही राजभर यांनी केला आहे.
महत्त्वाची विधेयकं मंजूर करणं सोपं होणार?
दरम्यान,आता राजभर यांनी केलेला दावा खरा निघाल्यास अखिलेश यादव त्यांच्या पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी नेमकं काय करणार? हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे. देशभरातील पक्षात अशीच फूट चालू राहिली तर संसदेत एनडीएचं संख्याबळ वाढू शकते. परिणामी मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारला अनेक विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी बहुमताचा आकडा गाठता येणे सोपे होऊ शकते. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.