
Mumai Business Man Extorsion Case : मुंबईतील एका उद्योजकासोबत भंयकर घडलं आहे. ज्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवला होता. त्याच ड्रायव्हरने उद्योजकाला मोठ्या अडचणीत टाकलं आहे. ड्रायव्हरने सलग चार वर्षे आपल्या मालकाचे व्हिडीओ आणि फोटो रेकॉर्ड केले. त्यानंतर या ड्रायव्हरने आपल्याच मालकाला 20 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्याच ड्रायव्हरने ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्यानंतर आता संबंधित उद्योजकाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता एकच खळबळ उडाली असून आरोपी फरार आहे. पोलिसांची अनेक पथकं आता या आरोपी ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गोरेगावात एक उद्योजक आहे. या उद्योजकाकडे गेल्या चार वर्षांपासून एक ड्रायव्हर काम करत होता. ऑफिसची मिटिंग असेल किंवा उद्योगाशी संबंधित एखाद्या क्लायंटला भेटायचे असेल, तर उद्योजक आपल्या ड्रायव्हरला कारने संबंधित ठिकाणी सोडायला लावायचा. या चार वर्षांच्या काळात उद्योजक आपल्या कामाच्या निमित्ताने अनेक क्लायंट्सना भेटला, यात काही महिलाही आहेत. या सर्व भेटींचे आणि संवादाचे व्हिडीओ त्याच्याच ड्रायव्हरने लपून रेकॉर्ड केले. ड्रायव्हरच्या फोनमध्ये बिझनेस मॅनचे काही फोटोही आहेत. आरोपीचे नाव शैलेंद्र सिंह असून तो 35 वर्षांचा आहे. तर उद्योजकाचे वय हे 38 वर्षे आहे.
व्हिडीओ आणि फोटो तुझ्या पत्नीला पाठवून देईन
ड्रायव्हरने आपल्याच मालकाचे व्हिडीओ आणि फोटो लपून काढले आहेत. बॉसची कोणतीही परवानगी नसताना त्याने हा प्रकार केला आहे. बरं फक्त एवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने 20 लाख रुपये दे अन्यथा हे सर्व व्हिडीओ आणि फोटो बिझनेस मॅनच्या पत्नीला पाठवून देईन, अशी धमकीही त्याने दिली. या धमकीनंतर संबंधित उद्योजक घाबरला आणि त्याने ड्रायव्हर शैलेंद्र सिंह याला 10 लाख रुपये द्यायचे मान्य केले.
पोलिसांची पथके रवाना
टोकन रक्कम म्हणून उद्योजकाने त्या ड्रायव्हरला 25 हजार रुपये दिले. परंतु प्रतिष्ठा आणि संसार तुटण्याच्या भीतीने शेवटी उद्योजकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. आता पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. आरोपी ड्रायव्हर सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी आरे पोलिसांची काही पथका रवाना झाली आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे.