
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या भेटीमागचे कारण काय आणि दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या भेटीला दुजोरा दिला. इतकेच नाही तर या बाबत एक मोठं विधान केलं.
दिल्लीतील NDA नेत्यांना भेटण्यात काहीही गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. सुत्रांच्या माहितीनुसार, भविष्यातही दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, या भेटीचा सुगावा कोणालाही लागू नये म्हणून एकनाथ शिंदे कोणताही सहाय्यक सोबत न घेता दिल्लीला गेले होते.अशी चर्चादेखील आहे. मात्र, नेमकं काय हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. दरम्यान शिंदेंची थेट प्रतिक्रिया राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. मात्र, त्यावेळी अमित शाह यांची वेळ मिळाली नव्हती. त्यामुळे ते महाराष्ट्रात परतले होते. त्यानंतर सतत प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आणि अखेर शनिवारी रात्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना भेटीसाठी दिल्लीला बोलावल्याचे समोर आले आहे.