
अमरावती येथे जैन धर्मगुरू निलेशचंद्र जैन मुनी यांनी मनसेवर जोरदार टीका केली. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक असल्याचे सांगताना त्यांनी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये पांढरा रंग वापरला जात असल्याचे म्हटले. काही ठिकाणी धार्मिक कारणांमुळे करण्यात आलेल्या रंगकामावरून वाद निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या संदीप देशपांडेंना काँग्रेसने सुपारी दिली आहे, असेही ते म्हणाले.
पुढे जैन मुनी म्हणाले, ‘जैन समाज हा शांत समाज आहे, मात्र आमच्या समाजाने बांगड्या घातल्या नाहीत; योग्य वेळ आल्यावर तुम्हाला उत्तर दिले जाईल. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील भिवंडी, मुंब्रा यांसारख्या अनेक ठिकाणी जावे, जिथे सगळं हिरवं असतं. तिथे जाऊन राजकारण करा.’
जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी करण्यात आलेल्या पट्ट्यांवरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्या पट्ट्या सुविधा म्हणून करण्यात आल्या असून त्यांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे जातीयवाद करत असल्याने त्यांचे आमदार, खासदार आणि नगरसेवक निवडून येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच योग्य वेळी मनसेला उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.