
भीमाशंकर देवस्थानाने व्हीआयपी दर्शन व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेत सर्वांसाठी समान नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला स्वतंत्र दर्शन सुविधा दिली जाणार नसून सर्व भाविकांना ऑनलाईन बुकिंगद्वारेच दर्शन घेता येणार आहे. देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच इतर मान्यवर व्यक्तींनाही आता सामान्य भाविकांप्रमाणेच ऑनलाईन स्लॉट बुक करून दर्शन घ्यावे लागणार आहे. दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणि समानता आणण्यासाठी हा निर्णय लागू करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली.
सध्या 24 तारखेपर्यंतचे सर्व ऑनलाईन स्लॉट भरले असून भाविकांनी दर्शनासाठी किमान 2 दिवस अगोदर बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे गर्दीचे योग्य नियोजन होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भीमाशंकर देवस्थानाचे मुख्यविश्वस्त मधुकर गवांदे यांनीही या निर्णयामुळे सर्व भाविकांना समान वागणूक मिळेल, असे स्पष्ट केले.