
तामिळनाडूत अजूनही सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. सुपरस्टार विजय थलपती यांना अजूनही बहुमताचा आकडा जुळवता आलेला नाही. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यास मना केलेलं आहे. आधी बहुमताचा आकडा दाखवा आणि मगच सरकार स्थापन करायला या, असं राज्यपालांनी थेटच सांगितल्याने विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अजूनही त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही. बहुमतासाठी 10 आमदार कमी पडत आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यात उशीर होत आहे. तर दुसरीकडे लवकर सरकार स्थापन होत नसल्याने सुपरस्टार विजय यांच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटताना दिसत आहे.
विजय थलपती यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा शनिवारी होणार होता. पण तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे विजय यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विजय यांच्या एका समर्थकाचा तर संयम इतका सुटला की त्याने स्वत:ला पेटवूनच घेतलं. सरकार स्थापन होण्यास विलंब होत असल्याने त्याने स्वत:ला आग लावून घेतली. त्यात तो गंभीर भाजल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाराज होता…
तामिळनाडूत सरकार स्थापन होण्यास उशीर होत असल्याने टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपती यांच्या समर्थकाने स्वत:ला जाळून घेतलं. इसक्कियप्पन असं या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो गंभीररित्या भाजला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला उशीर होत असल्याने इसक्कियप्पन नाराज आणि भावूक होता. विजय मुख्यमंत्री होतील याची गेल्या चार महिन्यापासून तो प्रार्थना करत होता. विजय यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी इसक्कियप्पन आस लावून बसला होता. एवढंच नाही तर विजय हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्याने देवाला साकडं घातलं होतं. 16 फूट भाला त्याने आपल्या चेहऱ्यातून आरपार घातला होता.
तामनिळनाडूत सरकार स्थापन होण्यास उशीर होत असल्याने कार्यकर्त्यांचा संयम तुटला आहे. त्यामुळे तमिलिसाई सौंदर्यराराजन यांनी विजय यांना राज्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्याची विनंती केली आहे. तामिळनाडूतील प्रत्येक व्यक्ती सरकार बनवण्यासाठी भावनात्मक रुपाने जोडला गेलेला आहे. नवीन सरकार स्थिर असावं, असं लोकांना वाटत आहे. जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान केला जात आहे. त्यामुळेच सरकार स्थापन करण्यासाठी अनेक संधी दिल्या जात आहे, असं तमिलिसाई म्हणाले.
आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, राजकीय अस्थिरतेमुळे विजय यांच्या समर्थकांकडून भावनात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्या अत्यंत चिंताजनक आहेत. व्हिसीके कार्यालयाबाहेर एका तरुणावर ब्लेडने हल्ला करण्यात आला. तर वल्लियूरमध्ये एका दुसऱ्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर आहे. विजय यांनी आपल्या समर्थकांना तात्काळ राज्यात शांतता राखण्याचं आवाहन करावं. कार्यकर्त्यांनी कोणतंही आतातायी पाऊल उचलू नये, असं आवाहनही करण्याचं आवाहन, तमिलिसाई यांनी केलं आहे.