
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी बंडखोरी उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. भाजपाचं 17 पैकी 14 मतदार संघात संख्याबळ अधिक असल्यानं महायुतीमध्ये जागा वाटपाचं गणित नेमकं कसं असणार? कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? भाजपला किती जागा मिळणार? राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. ही उत्सुकता अगदी शेवटपर्यंत कायम होती. शेवटी रविवारी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला. ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या अजित पवार गटाला 2 तर भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या.
परंतु यावेळी शिवसेना शिंदे गट 6 जागांवर आग्रही होता. आम्ही लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला जास्त जागा दिल्या, परंतु यावेळी आम्हाला 6 जागा हव्या आहेत अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून घेण्यात आली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील 3 जागांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळेच महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अगदी शेवटपर्यंत सुरू असल्याचं पहायला मिळालं. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर देखील एकनाथ शिंदे हे 5 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आली होती.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगर -जालना मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या मतदारसंघात महायुतीमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. ही जागा अधिकृतपणे महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली असताना देखील या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी चांगलाच जोर लावला होता. परंतु तरी देखील ही जागा भाजपच्या वाट्याला गेली, त्यानंतर इथे बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान समीर सत्तार यांनी माघार न घेतल्यास इथे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पहायला मिळू शकते.
तर दुसरीकडे अमरावतीमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. ही जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु त्यानंतर अमरावतीमध्ये देखील बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे, त्यामुळे आता कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण कायम ठेवणार? हे 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.