
मध्य पूर्वेत वाढलेल्या अमेरिका-इराण तणावाचा परिणाम आता भारतातील उद्योग आणि व्यापारावरही दिसून येत आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायाला या परिस्थितीचा मोठा फटका बसल्याची माहिती दिली आहे.
नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाचा डिटर्जंट उत्पादनाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्या सुनेकडे असून दर महिन्याला जवळपास १०० कंटेनर अमेरिकेला पाठवले जात होते. मात्र मध्य पूर्वेतील तणाव वाढल्यानंतर समुद्री वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आणि अनेक कंटेनर मार्गातच अडकून पडले.
या परिस्थितीमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. तरीही हार न मानता त्यांनी स्थानिक बाजारपेठेत माल विक्रीवर भर दिला. बदलत्या परिस्थितीत संघर्ष करत व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही गडकरी यांनी सांगितले.