
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. ही मुदत संपण्याच्या अगोदर आता राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असा कयास लावला जात होता. परंतु ऐनवळी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसनेही आम्हाला विचारात न घेतल्याने आम्ही आमचा उमेदवार देऊ, असं सांगितलं आहे. असं असतानाच आता शिंदे यांच्या शिवसेनेतही घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गट लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
नेमकं काय घडलं?
शरद पवार यांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने ऐनवळी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर आता काँग्रेसने दानवेंच्या नावाबाबत आम्हाला कल्पना नाही, असे सांगत आम्ही काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीत उमेदवारी देऊ, असे संकेत दिले आहेत. तसे झाले तर महाविकास आघाडीत एका प्रकारची फूट पडल्याचेच सिद्ध होईल.
शिंदे गट उमेदवार उतरवण्याची शक्यता
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर संपूर्ण 9 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु दानवे यांना तिकीट मिळाल्यामुळे आता शिंदे गटदेखील सक्रीय झाला असून अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटदेखील आणखी एका जागेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. एकूण 9 जागांपैकी पाच जागा भाजपा, एक जागा राष्ट्रवादी, दोन जागा शिंदे गट आणि एक जागा विरोधकांना मिळू शकते. परंतु शिंदे गट आणखी एक उमेदवार उभा करणार असेल तर या निवडणुकीत मोठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. आज रात्री एकनाथ शिंदे याबाबात महत्वाचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.