
उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदारांनंतर शिंदे गटाने मोर्चा आता आमदारांकडे वळवल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. सामंत यांच्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे. परंतु मी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. माझ्या संदर्भात अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगून विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा फेटाळून लावली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आणखी जोरदार चर्चा सुरू झाली. सामंत म्हणाले, विजय वडेट्टीवार आमचे चांगले मित्र आहेत. ते एकनाथ शिंदे यांचेही चांगले मित्र आहेत. विदर्भातील ताकदीचे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सर्वात जास्त मला आनंद होईल. खरंतर मी स्वत: देखील विजय वडेट्टीवार यांच्यासोबत काम केलं आहे’. मंत्री उदय सामंत यांच्या विधानावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, माझ्या बदनामीचं राजकारण थांबवा. मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केलाय. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला आहे. परंतु काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचे काम करताहेत’.
‘एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? पक्ष प्रवेश करणार का? कोणाला भेटले का? अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जाताहेत. यात कोणतंही तथ्य नसतानाही असे प्रश्न विचारून मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. हा खोडसाळपणा आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.