
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एका आठवड्यामध्येच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पहिले सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता विधान परिषदचे आमदार सचिन अहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. आता या सगळ्यावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “शब्दाला किंमत देणारी ही संघटना आहे. त्यामुळे लोक स्वतहून पक्षात येत आहे. राज्यात सहा खासदारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला. खासदार म्हणजे २० -२५ लाख लोकांमधून निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो. आपण का शिवसेनेत येतो हे प्रत्येकाने सांगितलं. जनतेला आणि मतदारसंघाला न्याय दिला पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि नेत्याने संकट काळात उभे राहिले पाहिजे ही माफक भावना असते. त्यामुळेच सर्व लोक येत आहे.”
पुढे ते म्हणाले की, “गोकुळ गीते यांनीही निवडून आल्यावर सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केलं आहे. कोणत्याही प्रकारचं आम्ही तोडकाम करत नाही. जोडकाम करतो. आम्ही तोडायला नाही जुडवायला आलो आहे. काही लोक तुडवायला आले. आम्ही शिवसेना वाढवायला आलो आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही. ज्या लोकांनी खुर्चीत बसवलं त्यांचे प्रश्न सोडवणं हा आमचा अजेंडा आहे. काही लोक सोडून गेल्यावर त्याबाबत चर्चा करतात. असे पर्यंत चांगला. आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट असं सुरू आहे. आताही काही लोकं काही म्हणतात त्यावर मी बोलणार नाही. आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातो, विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी पुढे जात आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही पुढे जात आहे.”
आजच्या दिवशीच घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ
“मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केलं. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे. त्यांनी सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम म्हणून काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचं मी स्वागत करतो. २०२२मध्ये देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, २०२२ रोजी उठाव झाला. ३० जून २०२२ रोजी माझा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. आज ३० जून आहे. हा योगायोग आहे. महायुतीने अडीच वर्षात कामे केली”, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.