
World Most Poisonous Bird Hooded pitohui: जगातील विषारी जीव म्हटले की अगोदर साप आठवतो. मग विंचू लक्षात येतो. पण सरपटणारे प्राणीच नाही तर पक्षी सुद्धा विषारी असतो हे ऐकून धक्का बसेल. पण जगात असा एक पक्षी आहे की जो मनुष्यासाठी साक्षात यमदुतच आहे. निसर्गातील या अनोख्या आणि सर्वात विषारी पक्षाचे नाव हुडेड पिटोहुई असे आहे. हा पक्षी न्यू गिनीच्या जंगलात आढळतो. हा जगातील एकमेव विषारी पक्षी मानला जातो.
असा लागला या पक्षाचा शोध?
शास्त्रज्ञ जॅक डंबाचर या पक्षी आणि निसर्गातील चमत्काराचा शोध घेत बाहेर पडले. 1980 च्या दशकात ते न्यू गिनीमध्ये शोध घेत होते. तेव्हा हा अनोखा पक्षी त्यांनी पाहिला. त्यांनी त्याला टिपले आणि हातात घेतले. त्यांनी त्याची छायाचित्र घेतली. थोड्यावेळाने त्यांचे डोळे, हात, तोंडाला जळजळ सुटली. थोड्याच वेळात त्यांना मोठा त्रास सुरू झाला. शरीराचे अवयव एकाएक सुन्न झाले. वेळीच त्यांच्यावर औषधोपचार झाला आणि ते बचावले. या पक्षाच्या पंखात आणि त्वचेला विषारी द्रव्य असल्याची जाणीव त्यांना झाली.
संशोधनातून केला खुलासा
वर्ष 1992 मध्ये एका संशोधन पुत्रिकेत डंबाचर आणि त्यांच्या टीमने या पक्षाविषयी पहिल्यांदा खुलासा केला. हुडेड पिटोहुई या पक्षाच्या शरीरात बॅट्रोकोटॉक्सिन नावाचे अत्यंत घातक विष आढळते. असेच विष घनदाट जंगलातील काही बेडकांमध्ये सु्द्धा आढळते. हेच विष या पक्षाला शिकारी पक्षांपासून वाचवते. इतर प्राणी आणि पक्षी हुडेड पिटोहुईच्या वाट्याला जात नाहीत. एखाद्या प्राण्याने, पक्षाने त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला तर तो वाचत नाही.
अर्थात या पक्षाचे शरीर हे विष तयार करत नाही. तर शास्त्रज्ञांच्या मते, हा पक्षी मेलिरिड बीटल्स नावाचे विषारी कीटक खातो. या किटकांमध्ये बॅट्रोकोटॉक्सिन असते. जेव्हा हा पक्षी हे कीटक खातो, तेव्हा त्याची त्वचा आणि पंखात विष तयार होते. त्याला हात लावताच मनुष्यालाही धोका उत्पन्न होतो. लवकर उपचार न मिळाल्यास मनुष्य बेशुद्ध होतो आणि लवकरच बरा होण्याची शक्यता फार कमी असते. हा पक्षी चमकदार काळ्या आणि नारंगी रंगाचा असतो. हा रंग इतर प्राणी आणि पक्षांना इशारा देतो. न्यू गिनीतील स्थानिक लोकही या पक्षाच्या वाटेला जात नाही. स्थानिक आदिवासी या पक्षाला रबिश बर्ड असे म्हणतात.