
आजच्या महागाईच्या जगात आहे ती संपत्ती टिकवणं देखील कठीण झालं आहे. अशात सोनं, चांदी आणि पैसे जपून ठेवणं देखील मोठं आव्हान आहे. कारण कधी काय होईल सांगता येत नाही. अशात एका महिलेचा उत्साह एका रात्रीत मोठ्या दुःखात बदलला आहे. महिलेने तिच्याकडे असलेल्या सोनं, चांदी आणि पैशांसोबत एक रील पोस्ट केली आणि एका रात्रीत चोरांनी सर्वकाही लंपास केलं. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातूव एक घटना उघडकीस आली आहे, जिथे सोशल मीडियावर सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि आलिशान गाडीसोबतचे स्वतःचे फोटो शेअर करणाऱ्या एका महिलेच्या घरातून चोरांनी लाखो रुपये चोरले. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रचना गुर्जर नावाच्या महिलेच्या घरात रात्री चोरी झाली. चोरांनी सुनियोजितरित्या घरात चोरी केली आहे. सर्वात आधी चोर महिलेच्या घराबाहेर पोहोचले आणि भितींवर लागलेल्या तारा कापल्या. त्यानंतर पायऱ्यांनी घरात प्रवेश केला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, चोरांनी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काठीने फोडले, ज्यामुळे घटना कॅमेऱ्या कैद झाली आहे. पण कॅमेरा फोडण्यापूर्वीच्या चोरांच्या काही हलचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, चोरी मोठ्या सावधगीरी बाळगून करण्यात आली आहे.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरांनी तिजोरीचा टाळा फोडला आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. चोरी केल्यानंतर चोर घरातून फरार झाले. कुटुंबियांनी चोरीची माहिती सकाळी उठल्यानंतर कळली. घरातील सामान सर्वत्र पसरलेलं होतं. कपाट तुटलेलं होतं आणि तिजोरीतील मैल्यवान वस्तू गायब होत्या. त्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
पीडित महिला रचना गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळेच गुन्हेगारांना त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंची माहिती मिळाली असावी, असा त्यांना संशय आहे. पोलीस या पैलूचाही तपास करत आहेत.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजीव मूल यांनी सांगितल्यानुसार, पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचं प्रयत्न सुरू आहेत. पोलीस लवकरच आरोपीला अटक करून चोरीचा माल जप्त करतील, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर, परिसरातील रहिवाशांना सोशल मीडियावर वैयक्तिक आणि मौल्यवान माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देखील दिला जात आहे.