
राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केली होती, त्यानंतर त्याचे एक -एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणानं राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, न्यायालयानं त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अशोक खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे आता या नेत्यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो समोर आले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दीपक केसरकर यांचे काही फोटो दाखवून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केसरकरांच्या चौकशीची मागणी एसआयटीकडे केली आहे. चाकणकर आणि केसरकरांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत, केसरकरांचा खरातसोबत नेमका काय संबंध आहे? असा सवाल यावेळी अंधारे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान अंधारेंनी या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांच्यासोबतच भाजपचे मंत्री अतुल सावे आणि हेमंत गोडसे यांचे देखील फोटो दाखवले आहेत. यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या देखील काही फोटोंचा समावेश आहे.
सुषमा अंधारे यांनी अशोक खरात याच्यासोबत दीपक केसरकर यांचे काही फोटो दाखवले आहेत. या फोटोमध्ये चाकणकर देखील दिसत आहेत. हे फोटो पत्रकार परिषदेमध्ये दाखवताना चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या का? असा सवालही अंधारे यांनी केला आहे. तसेच आपण केसरकरांच्या चौकशीची मागणी एसआयटीकडे केली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. या प्रकरणावरून अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला आहे. 2024 साली अशोक खरात याच्या बंदुकीच्या परवान्याचं नुतनीकरण कोणी केलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.