
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग अडचणीत आले आहे. युरोपीय देशांसोबतच पश्चिम आशियाई देशांमध्ये मोठे उर्जासंकट आले आहे. पाकिस्तान या देशात प्रचंड महागाई वाढली आहे. दुसरीकडे भारतालाही या युद्धाचे चटके बसू लागले आहेत. भारतात गॅस सिलिंडरची किंमत वाढलेली आहे. तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलचा भावही वाढण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेची कोंडी करण्यासाटी फेब्रुवारी महिन्यापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी बंद केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगभरात कच्च्य तेलाची, नैसर्गिक वायुची, खतांची तसेच इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीवर अद्याप एकमत न झाल्याने हे उर्जासंकट भविष्यात आणखी भीषण आणि चटके देणारं ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्यायी व्यापार मार्ग, तेलवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा शोध घेतला जात आहे. हे अन्य पर्याय कोणते आहेत आणि या पर्यायांच्या माध्यमातून केली जाणारी गॅस आणि तेल वाहतूक किती किफायतशीर आहे, ते जाणून घेऊ या…
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोण-कोणत्या गोष्टींची वाहतूक होते?
दोन महिने उलटलेले असले तरी अद्याप इराणचे युद्ध थांबलेले नाही. या दोन महिन्यांपासून होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. या मार्गातून होणारी कच्च्या तेलाची, नैसर्गिक वायूची वाहतूक युद्धापूर्वीच्या वाहतुकीच्या तुलनेत खूपच कमी आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून फक्त तेलच नव्हे तर युरीया आणि हेलियम अशा महत्त्वाच्या घटकांचेही वहन होते. युद्धाच्या अगोदर या जलमार्गातून दररोज दोन कोटी बॅरल कच्च्या तेलाची तसेच अन्य पेट्रोलीयम उत्पादनांची वाहतूक व्हायची. याच मार्गातून जगाच्या एकूण पुरवठ्यापैकी साधारण 20 टक्के नैसर्गिक वायूचा पुरवठा याच मार्गातून होतो. जगातील एक तृतियांश हेलियम तसेच एवढ्याच प्रमाणात युरियाचीही वाहतूक याच मार्गाने होते.
होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय काय?
होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक व्यापाराच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. परंतु युद्ध तसेच अन्य कारणांमुळे या मार्गातील व्यापार ठप्प पडण्याची शक्यता कायम असते. म्हणूनच गेल्या अनेक दशकांपासून या मार्गाला वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग शोधला जात आहे. यात काही प्रमाणात यशही आलेले आहे. आता पर्यायी मार्गाने 35 ते 55 लाख बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गांनी केली जात आहे. परंतु एकूम गरजेच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.
सौदी अरेबियाचा प्लॅन बी- पेट्रोलाईन
होर्मुझला पर्याय ठरावा यासाठी सौदी अरेबियात तेल वाहून नेण्यासाठी एक पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. या पाईपलाईनला पेट्रोलाईन असे म्हटले जाते. 1980 च्या दशकात तयार करण्यात आलेल्या या पाईपलाईनला इस्ट-वेस्ट पाईपलाईन असेही म्हणतात. पहिल्या टँकर युद्धाच्या काळात या पाईपलाईनची निर्मिती करण्यात आली होती. पहिल्या टँकरच्या युद्धात इराण आणि इराक यांच्या संघर्षात व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळेच या पर्यायी पाईपलाईनच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पुढे 2019 साली या पाईपलाईनची तेल वाहून नेण्याची क्षमता वाढवून 70 लाख बॅरल प्रतदिनपर्यंत नेण्यात आली.
परंत लाल सागराच्या किनाऱ्यावरील यनबू येथील लोडिंग टर्मिनलवरील जहाजांमध्ये एवढ्याच क्षमतेने तेल वाहून नेण्याची क्षमता नाही. म्हणूनच तेलवाहू जहाजांचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते ही पाईपलाईन अजूनही पूर्ण क्षमतेने काम ककरत नाहीये. दुसरीकडे यनबू येथून युरोपात नेले जाणारे तेल इजिप्तमधील सुमेड पाईपलाईनद्वारे वाहून नेले जाते. या पाईपलाईनची क्षमता 25 लाख बॅरल प्रतिदिन एवढी आहे. इराणचे युद्ध सुरू झाल्यानंतर या पाईपलाईनमधून तेल वाहून नेण्याची क्षमता 150 टक्के वाढवण्यात आली आहे. तरीदेखील या पाईपलाईनची तेल वाहून नेण्याची क्षमता खूपच कमी असल्याने युरोपमधील तेलसंकट अजूनही कायम आह.
संयुक्त अरब अमिरातीची ADCOP पाईपलाईन काय आहे?
होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय म्हणून ADCOP या दुसऱ्या पाईपलाईनचा विकास करण्यात आला. ही पाईपलाईन संयुक्त अरब अमिरातीतूून जाते. ADCOP या पाईपलाईनचे पूर्ण नाव अबू धाबी क्रूड ऑईल पाईपलाईन असे आहे. ही पाईपलाईन हबशान येथून ओमान येथील फुजैरा इथपर्यंत जाते. या पाईपलाईनमधून प्रतिदिन 20 बॅरल तेल वाहून नेले जाऊ शकते. खाडीमधून हिंद महासागरात निघणारी ही एकमेव आणि महत्त्वाची पाईपलाईन आहे. परंतु पेट्रोलाईनप्रमाणेच इराणच्या युद्धात या पाईपलाईनलाही लक्ष्य करण्यात आलेले आहे. मार्च महिन्यात 3, 14,16 तारखेला फुजैरा येथे इराणने ड्रोन हल्ले केले होते. त्यामुळे काही टँकर्सना आग लागली होती. त्यामुळे या पाईपलाईनचे काम ठप्प पडले होते.
इराक आणि कुवैतपुढे सर्वात मोठी अडचण
इराण युद्धामुळे आखाती तेल उत्पादक देश चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. इराणच्या युद्धाअगोदर इराक या देशातून कच्च्या तेलाची निर्यात प्रतिदिन 34 लाख बॅरल प्रतिदिन एवढी होती. तेलाची बहुतांश वाहतूक ही बसरा या बंदरातून तसेच होर्मुझच्या सामुद्रधुुनीतून होत असे. इराकला तेल वाहतुकीसाठी उत्तरेतील एक पाईपलाईन आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून किरकूकच्या तेल क्षेत्रांना तुर्कीमधील सेहानशी जोडण्यात आलेले आहे. ही पाईपलाईन अगोदर अडीच वर्षे बंद होती. नंतर 2025 सालच्या सप्टेंबर महिन्यात चालू करण्यात आली. मार्च 2026 पासून या पाईपलाईनद्वारे प्रतिदिन 2.5 लाख बॅरल तेलाची वाहतूक केली जाते. परंतु इराणच्या युद्धामुळे इराकला झालेले नुकसान खूपच जास्त आहे.
इराकपेक्षाही कुवैतची स्थिती खूपच बिकट आहे. इराण युद्धाच्या अगोदर या देशातून प्रत्येक दिवशी 20 लाख प्रतिबॅरल या हिशोबाने कच्च्या तेलाची वाहतूक केली जायची. या देशाचे प्रत्येक जहाज होर्मुझमधूनच जायचे. कुवैत या देशाजवळ अन्य कोणताही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे कुवैतची स्थिती या युद्धामुळे जास्तच बिकट झाली आहे. दरम्यान, काही देशांकडे तेलाची वाहतूक करण्यासाठी काही पर्याय असले तरीही ते पुरेसे नाहीत. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी सुरू होणे, हेच सर्वोत्तम असल्याचे बोलले जात आहे. आता भविष्यात काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.