
03 May 2026 03:14 PM (IST)
वर्धा : उन्हाळ्यामुळे फळांच्या मागणीत वाढ
वर्धा जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. हंगामी फळांसोबतच विविध फळांची मागणी वाढली आहे. काही फळांच्या किंमतीत वाढ, काही फळाच्या किंमतीत घट तर काही फळांच्या किंमती स्थिर आहेत.
03 May 2026 02:59 PM (IST)
पवना नदीत पोहण्याचा मोह नडला, पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू
उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि विकेंडच्या निमित्ताने मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील थूगाव परिसरातील पवना नदी पात्रात ही घटना घडली. प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख अशी मृतांची नावे आहेत. रविवार सुट्टी असल्याने हे तिघेही पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सध्या वाढत असलेल्या उकाड्यामुळे त्यांना नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह झाला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ शिवदुर्ग मित्र मंडळ यांनी तातडीने मदतकार्य राबवून मृतदेह बाहेर काढले. पर्यटनासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे नदी-नाल्यात पोहताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
03 May 2026 02:45 PM (IST)
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गोराई पॅगोडाची पाहणी केली
पियुष गोयल यांच्या हस्ते बोरिवली जेट्टी पोलीस चौकी आणि फिश मार्केटचेही उद्घाटन करण्यात आले. गोराई येथील पॅगोडा येथे उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भेट देत संपूर्ण पॅगोडा तसेच म्युझियमची सखोल पाहणी केली. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित चित्रफीतही पाहण्यात आली. या भेटीदरम्यान त्यांनी विपश्यना ध्यानाचे मानवाच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करत, विपश्यना केल्यानंतर होणारा सकारात्मक बदल अनुभवण्यासाठी अधिकाधिक लोकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन केले.
03 May 2026 02:30 PM (IST)
नसरापूर प्रकरणावरून गनिमी कावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक…
नसरापूर येथे चिमुरडी वरती लैंगिक अत्याचार व निर्घृण खून झालेल्या प्रकरणी राज्यभरात संतप्त लोकभावना निर्माण झाली आहे. पुण्यात गनिमी कावा संघटनेच्या वतीने सिटी प्राईड सातारा रोड चौकात टायर जळून या घटनेचा निषेध करण्यात आला आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
03 May 2026 02:20 PM (IST)
जळगाव जिल्ह्यात सलग 10 ते 15 दिवसांपासून तापमानाचा 40 शी पार कायम
जळगावात आज तापमानाचा पारा 42 अंशावर असल्याचे पाहायला मिळत आहे. मे महिना सुरू झाला असून मे हिटचा तडाखा देखील बसत आहे. तापमानात 2 अंशांनी घट झाली असली तरी उकाडा कायम आहे. उकाड्यामुळे जळगावातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र असून उकाड्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. उकाडा घालवण्यासाठी नागरिक शीतपेयांच्या दुकानावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे..
03 May 2026 02:11 PM (IST)
निकालाच्या एक दिवसापूर्वीच अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर पुण्यात झळकले….
राहुरी विधानसभा पोट निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवसापूर्वीच अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. पुण्यातील नगर रोड परिसरात मित्रा आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत…
03 May 2026 02:03 PM (IST)
सोलापुरात वर्चस्ववादातून भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या
भर रस्त्यात गाडी आडवून कोयता आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुरेश श्रीराम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. 5 जणांच्या टोळक्याने शहरातील 70 फूट रोडवर ही धक्कादायक प्रकार घडलाय. वराह पालनावरून आरोपी आणि मयतात पूर्वीपासून वाद होता. याशिवाय मृत सुरेश श्रीरामवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यामध्ये 6 पैकी 5 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
03 May 2026 02:00 PM (IST)
नाशिकमध्ये रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला आहे. मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान झालेल्या तणावावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप केला आहे. प्रशासनाच्या विरोधात उद्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकरी जन आक्रोश आंदोलन करणार आहेत.
03 May 2026 01:50 PM (IST)
मुंबई–पुणे एक्सप्र्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ ठरतंय सेल्फी पॉइंट की धोक्याचं ठिकाण? पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मुंबई–पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक व्हॅली ब्रिज ठरतंय सेल्फी पॉइंट की धोक्याचं ठिकाण?मुंबई हुन पुण्याला येताना घाटातील बोगदा संपताच अनेक वाहनचालक ह्या व्हॅली ब्रिज चा सेल्फी घेण्यासाठी थांबत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे…१०० ते १२० च्या वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये ही एक चूक जीवावर बेतू शकते…याच पार्श्वभूमीवर बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलीसांनी स्पष्ट इशारा दिला होता तरी ही वाहन चालक सेल्फी चा मोह आवरत नव्हते अखेर रायगड महामार्ग पोलिसांनी कारवाई चा बडगा उगारला असून मिसिंग लिंक व्हॅली ब्रिज वर सेल्फी साठी थांबनऱ्यावर कारवाई सुरू केली आहे,ह्या कारवाई दरम्यान अनेक वाहन चालक पोलिसां सोबत हुज्जत देखील घालत असल्याने पोलीस आता दंडात्मक कारवाई सोबत गुन्हे देखील दाखल करणार असल्याचे रायगड वाहतूक महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.
03 May 2026 01:40 PM (IST)
नसरापूर प्रकरणावरून गनिमी कावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
नसरापूर येथे चिमुरडी वरती लैंगिक अत्याचार व निर्घृण खून झालेल्या प्रकरणी राज्यभरात संतप्त लोकभावना निर्माण झाली आहे पुण्यात गनिमी कावा संघटनेच्या वतीने सिटी प्राईड सातारा रोड चौकात टायर जळून या घटनेचा निषेध करण्यात आला आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली
03 May 2026 01:30 PM (IST)
महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांवर निशाणा
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांना निवडणुकात पाडा असे वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केले. इतके दिवस काँग्रेससाठीच अशोक चव्हाण जोगवा मागत फिरत होते आणि आता अशा प्रकारचे विधान करणे हास्यास्पद आहे.मला त्यांना आठवण करून द्यायचे आहे की, जेव्हा महिलांना आरक्षण 73 व्या आणि 74 व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून झाले, त्यावेळी 33 टक्के आरक्षण महिलांना दिल्या गेलं होत. अशोक चव्हाण यांचे पिताश्री शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री होते. तेव्हा महिलांना पहिल्यांदा आरक्षण मिळालं होत, अशी टीका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
03 May 2026 01:20 PM (IST)
हर्षवर्धन सपकाळ इस्लामपूरमध्ये
नांदेड शहरातील इस्लामपूर परिसरात असलेल्या खड्ड्याच्या पाण्यात चार मुलं बुडून मृत्यू पावले होते. मयत मुलांच्या कुटुंबियांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इस्लामपूर परिसरातील घरी जाऊन सांत्वन पर भेट घेतली. घराच्या बाहेर ऐन तळपत्या उन्हात बसूनच हर्षवर्धन सपकाळ यांनी मयत मुलांच्या कुटुंबाशी चर्चा करीत माहिती घेतली. यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
03 May 2026 01:10 PM (IST)
नऊ वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचे लैंगिक अत्याचार, दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील निघोजे येथे एका नऊ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील एका इमारतीत घडली. आरोपी तस्लिम मलिक अली(रा. निघोजे, ता. खेड) याने पीडित मुलगी जिन्यावरून जात असताना तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून आरोपीने तिला “चिल्लाओ मत, किसीको बताना नही” अशी धमकी दिली.या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना घडला प्रकार सांगितला, त्यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
03 May 2026 01:01 PM (IST)
परतवाडा येथील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण, तीन पोलीस मुळ ठाण्यात
अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचाराचं प्रकरणात मुख्यालयात अटॅच केलेल्या तीन कर्मचाऱ्यांना पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये पाठवलं. SIT ची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीचं तत्कालीन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा अजब आदेश दिला. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात गठीत केलेल्या SIT चा तपास प्रभावित होऊ नये म्हणून पुरुषोत्तम बावनेर, मोहन वावरे, अब्दुल नाझीम यांना मुख्यालयात करण्यात अटॅच आले होते. मात्र एसआयटीचा तपास सुरू असतानाच तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडून तीनही कर्मचाऱ्यांना मूळ पोलीस स्टेशनला पाठवलं.
03 May 2026 12:55 PM (IST)
मिसिंग लिंकच्या सुरुवातीनंतर पहिल्यांदाच नियंत्रण कक्ष शांत!
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच नियंत्रण कक्ष शांत… मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील कोंडी आणि अपघाताबाबत नियंत्रण कक्षाला एकही फोन नाही…. मिसिंग लिंकचा महामार्गाला पुरेपूर फायदा….
03 May 2026 12:45 PM (IST)
राजकीय परिस्थितीमुळं शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला-बच्चू कडू
राजकीय परिस्थितीमुळं शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं भुवया उंचावणारं वक्तव्य
03 May 2026 12:30 PM (IST)
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला वेग
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा 31 मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता.. 12 स्थानकांचे काम पूर्ण… 15 मे रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत उद्घाटनावर अंतिम शिक्कामोर्तब होईल..
03 May 2026 12:15 PM (IST)
सिडकोच्या 16 हजार 876 घरांची सोडत लांबणीवर
मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सिडकोच्या 16 हजार 876 घरांची सोडत लांबणीवर…. यामुळे अर्जासाठी भरलेले लाखो रुपये सिडकोकडे अडकले…. हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका…
03 May 2026 11:59 AM (IST)
इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा आज शाही विवाहसोहळा; 100 एकर परिसरात जय्यत तयारी
संगमनेर तालुक्यातील कगुंजाळवाडी इथं आज इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 100 एकर परिसरात या विवाहसोहळ्याची भव्य तयारी करण्यात आली असून लाखो पाहुण्यांच्या उपस्थितीची शक्यता आहे. गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि किर्तनपुष्पानंतर मुख्य विवाहसोहळा पार पडणार आहे.
या लग्नसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. राजकीय नेते, संत-महंत यांची मोठ्या प्रमाणात हजेरी असेल. मुलीच्या भव्य साखरपुड्यानंतर इंदोरीकर महाराज सोशल मीडियावर चर्चेत होते. “उपदेश एक, आचरण दुसरं?” असा सवाल करत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. तर साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करण्याचं महाराजांनी जाहीर केलं होतं.
03 May 2026 11:50 AM (IST)
नसरापूर प्रकरणात आरोपीला मृत्यूदंड देण्यासाठी प्रयत्न- फडणवीस
“पीडितेच्या वडिलांशी मी दोन वेळा बोललो. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी फास्ट ट्रॅक घेत आहोत. घटना गंभीर असल्याने लोकांचा रोष स्वाभाविक आहे. न्यायालयात वेगाने हे प्रकरण मार्गी लागेल, यासंदर्भातील पत्र आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांना दिला आहे. मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी परिस्थिती समजून घेतली,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
03 May 2026 11:40 AM (IST)
एकच दिशादर्शक असल्याने मिसिंग लिंकच्या सुरुवातीला वाहनचालकांची गफलत
पुण- मुंबई मिसिंग लिंक सुरू झाला असून कालपासून या महामार्गावर एकाही ठिकाणी वाहतूक कोंडी किंवा अपघात झाला, असा कॉल आलेला नाही. मात्र पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मिसिंग लिंक मार्गिकेच्या तोंडावर वाहनचालकांची गफलत होताना पाहायला मिळत आहे. दोन किलोमीटरवर एक मोठा एमएसआरडीसी प्रशासनाकडून दिशादर्शक फलक लावण्यात आलेला आहे, मात्र मिसिंग लिंकच्या सुरुवातीला अनेक वाहनचालकांची गफलत होत आहे.
03 May 2026 11:30 AM (IST)
बालहक्क समितीकडूनही नसरापूरमधल्या घटनेची योग्य दखल घेतली नाही- रोहित पवार
राज्य महिला आयोगाने अद्याप दखल घेतली नाही. चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. बालहक्क समितीकडूनही या घटनेची योग्य दखल घेतली गेली नाही. बालहक्क समितीने लवकर पावलं उचलावीत. सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करावी. महिला आयोगाच्या रिक्त अध्यक्षपदी निवृत्त IAS अधिकारी नेमावा. या खटल्यासाठी सरकारने चांगले वकील द्यावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
03 May 2026 11:20 AM (IST)
धाराशिवच्या कळंबमध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी
धाराशिवच्या कळंबमध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी पहायला मिळतेय. डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा असल्याने कालपासून काही पंपांवर गर्दी आहे तर काही पंप डिझेल नसल्याने बंद केले आहेत.
03 May 2026 11:10 AM (IST)
नाशिकच्या चांदीच्या गणपतीला अकरा किलो चंदनाचा लेप
नाशिकच्या चांदीच्या गणपतीला अकरा किलो चंदनाचा लेप लावण्यात आला. तर मंदिरात 51 किलो मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली. उष्म्यापासून चांदीच्या गणपतीला थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात चांदीचा गणपती सुप्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णता वाढत असल्याने मंदिरात गारवा निर्माण करण्यासाठी चंदन लावण्यात आलं आहे.
03 May 2026 11:00 AM (IST)
साध्वी कंचनजी महाराज यांनी मराठी भाषेसंदर्भात घेतली हाजी अराफत यांची भेट
मुंबईतील कुर्ला इथल्या वाहतूक गड मध्यवर्ती कार्यालयात जगद्गुरु माता साध्वी कंचनजी महाराज यांनी मराठी भाषेसंदर्भात हाजी अराफत यांची भेट घेतली. मराठी भाषा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या मराठी प्रशिक्षण पुस्तकाचं उद्घाटन करून उपस्थित रिक्षाचालकांना पुस्तकाचं वितरण करण्यात आलं.
साध्वी कंचन जी महाराज यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकून तिचा सन्मान राखावा, असं आवाहन केलं. राज्य सरकार आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगत वाहतूक कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबतही आश्वस्त केलं.
03 May 2026 10:50 AM (IST)
धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेने पाणी पातळीत झपाट्याने घट
धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यामध्ये 34% पाणीसाठा शिल्लक आहे 226 प्रकल्पापैकी 25 प्रकल्प असून 80 प्रकल्पामध्ये केवळ पंचवीस टक्केच पाणी शिल्लक आहे जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने धरणातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे या संदर्भात तेरणा धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी पाहुयात
03 May 2026 10:40 AM (IST)
धाराशिव जिल्ह्यातील कळंब ढोकी परिसरात पेट्रोल डिझेल टंचाई
अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल नसल्याने बंद, शेती मशागतीची काम ठप्प. दररोज दैनंदिन कामालाही मोठा फटका, पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिक संतप्त,सकाळी पेट्रोल पंप बंद. पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहन चालक.
03 May 2026 10:30 AM (IST)
पोलिस फक्त राजकीय सुरक्षेसाठी काम करत आहेत- संजय राऊत
संजय राऊत यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. पुण्याच्या घटनेबद्दल बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी म्हटले की, पोलिस फक्त राजकीय सुरक्षेसाठी काम करत आहेत.
03 May 2026 10:20 AM (IST)
सरकारला जबाब विचारला पाहिजे- संजय राऊत
संजय राऊत यांनी नुकताच मोठे विधान करत म्हटले की, सरकारला माता भगिनींनी जाब विचारला पाहिजे. पुण्याच्या घटनेवरून संजय राऊत सरकारवर टीका करताना दिसले.
03 May 2026 10:05 AM (IST)
मुख्यमंत्र्यांना फक्त इतर राज्यातील प्रचारावेळ- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी अत्यंत मोठी टीका केली. संजय राऊत यांनी पुण्याच्या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, मुख्यमंत्र्यांना फक्त इतर राज्यातील प्रचाराकरिता वेळ आहे.
03 May 2026 09:56 AM (IST)
नागपुरात सामूहिक कॉपी भोवली! २४३ विद्यार्थ्यांवर बोर्डाची मोठी कारवाई, २ केंद्रांची मान्यता रद्द
नागपूर: बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करणाऱ्या २४३ विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने मोठा दणका दिला आहे. वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला असून, या केंद्रांची मान्यताही बोर्डाने आता कायमची रद्द केली आहे. विशेष म्हणजे, शनिवारी निकालासोबतच बोर्डाने या कारवाईची घोषणा केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पेपर तपासणी दरम्यान शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही चौकशी करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याची ही अलीकडच्या वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे कॉपी बहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.
03 May 2026 09:46 AM (IST)
जळगावच्या धरणगाव शहराचा पाणीपुरवठा ३ दिवस राहणार बंद; मुख्य जलवाहिनी फुटल्याने हाल
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी हे काम पूर्ण झाल्यानंतर टाक्यांपर्यंत पाणी पोहोचून शहराला नियमित पुरवठा सुरू होण्यासाठी किमान २ ते ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात ही समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, धरणगाव नगरपरिषदेने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे.
03 May 2026 09:36 AM (IST)
नाशिक जिल्हयातील ११ हजार विद्यार्थी आज नीट परीक्षा देणार, २१ केंद्रांवर कडक नियोजन
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा आज नाशिक जिल्ह्यात पार पडत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण २१ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, सुमारे ११ हजार विद्यार्थी आपले नशीब आजमावणार आहेत. नाशिक शहरातील १८ केंद्रांवर ९ हजार १२९, तर मालेगावमधील ३ केंद्रांवर १ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार असली, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजल्यापासूनच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा पूर्णपणे गैरप्रकारमुक्त आणि सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने कडक नियमावली लागू केली असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
03 May 2026 09:26 AM (IST)
नाशिक भोंदू बाबा अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीची कोर्टात धाव
महिलांवर लैंगिक अत्याचार आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. खरातचा ताबा मिळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात धाव घेतली असून ‘प्रॉडक्शन वॉरंट’साठी अर्ज केला आहे. ६ एप्रिल रोजी ईडीने खरातविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी ईडीने खरातच्या कार्यालयावर आणि इतर ठिकाणांवर छापेमारी करून अनेक पुरावे गोळा केले होते. आता खरातची सखोल चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्याची मागणी ईडीने केली असून, या अर्जावर येत्या शनिवारी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
03 May 2026 09:18 AM (IST)
पुणे: चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर, राजगड तालुक्यात कडकडीत बंद
भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज भोर आणि राजगड तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सर्व व्यापारी संघटना, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या बंदचे आवाहन केले होते, ज्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले आहेत. या नराधम आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, ही एकच मागणी केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
03 May 2026 09:13 AM (IST)
मुंबईत अक्सा चौपाटीवर बुडणाऱ्या ४ मुलांना वाचवले
उन्हाळी सुट्ट्यांमुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, मालाडमधील अक्सा चौपाटीवर शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनांत चार मुले बुडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पहिल्या घटनेत १३ वर्षीय विशाल मंजुनाथ चीला हा मुलगा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागला, ज्याला जीवरक्षकांनी तत्परतेने वाचवले. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालाड ओरलम चर्च परिसरातून आलेली आरुष मांजरे (१४), संतोष हरिजन (१५) आणि मिल्टन चेट्टी (१६) ही तीन मुले आयएनएस हमला हद्दीजवळ ओहोटीच्या पाण्यात ओढली गेली. या मुलांची प्रकृती धोक्यात असल्याचे पाहून जीवरक्षक कॅप्टन नथुराम सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उड्या घेतल्या. या शर्थीच्या प्रयत्नांमुळे चारही मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना सुरक्षितपणे पोलीस आणि पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
03 May 2026 09:08 AM (IST)
धाराशिवमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने पेट्रोल पंप ठप्प; ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पेट्रोल पंपांवरील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. अचानक वीज गेल्याने शहरातील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी कळंबमध्ये दाखल झाल्याने गर्दीत अधिकच भर पडली. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आता वीज पुरवठा सुरळीत होऊन पेट्रोल पंप पुन्हा सुरू झाले आहेत, ज्यामुळे निर्माण झालेली गर्दी कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
03 May 2026 09:03 AM (IST)
मिरा भाईंदरमध्ये भीषण आग; झोपडपट्टी जळून खाक
मिरा-भाईंदर पूर्वेकडील आरएनए प्रोजेक्ट परिसरात आज भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील संपूर्ण झोपडपट्टी जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.