
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या टीव्हीके पक्षाने 107 जागांवर विजय मिळवला आहे. विजय हे चेन्नईच्या समुद्रकिनारी असलेल्या अत्यंत आलिशान महालात राहतात.
विजय यांच्या या बंगल्याची किंमत तब्बल 70 ते 80 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय. नीलंकराई इथल्या कॅसुरीना ड्राइव्हवर वसलेला हा आलिशान बंगला थेट बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर आहे. या बंगल्यातून समुद्राचं विस्तीर्ण दृश्य पहायला मिळतं. त्याचसोबत शांत सागरी वातावरण अनुभवायला मिळतं.
विजय यांच्या या बंगल्याची रचना अत्यंत सुबक आणि सुव्यवस्थित आहे. आधुनिक आणि पारंपरिक शैलींचं उत्कृष्ट मिश्रण करत आतल्या लिव्हिंग स्पेसचं डिझाइन करण्यात आलं आहे. आरामदायी खुर्च्या, सोफे, काळजीपूर्वक निवडलेल्या कलाकृती, लाकडी पॅनेलिंग.. हे सर्व त्यात पहायला मिळतं.
खिडक्यांमधून भरपूर सूर्यप्रकाश येईल, याचा विचार करून बंगल्याची रचना करण्यात आली आहे. तसंच क्रॉस व्हेंटिलेशन आणि मोकळ्या रचनेमुळे बंगल्यातील प्रत्येक खोली हवेशीर आणि प्रशस्त वाटते. विजय यांच्या या प्रॉपर्टीमध्ये एक खाजगी जिम, स्विमिंग पूल, आणि बागसुद्धा आहे.
थलपती विजय हे सर्वांत श्रीमंत साऊथ सेलिब्रिटींपैकी एक आहेत. एका चित्रपटासाठी ते तब्बल 130 ते 200 कोटी रुपये मानधन घेत असल्याचं समजतंय. परंतु राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणं सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. 'जन नायकन' हा त्यांच्या करिअरमधला शेवटचा चित्रपट ठरणार आहे.