
भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) रुपाली चाकणकर यांची तब्बल चार तास चौकशी केली. दरम्यान, काही महिला नेत्यांनी चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणीही केली आहे.
अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर विविध स्तरांतून आरोप करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर तब्बल दीड महिन्यानंतर त्या नाशिकमध्ये एसआयटीसमोर हजर झाल्या. चौकशीदरम्यान एसआयटीकडून त्यांना एकूण आठ महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एसआयटीने विचारलेल्या प्रश्नांमध्ये अशोक खरातसोबतची ओळख नेमकी कधीपासून होती, शिवनिका संस्थानमध्ये असताना खरातच्या कथित गैरप्रकारांची माहिती होती का, तसेच खरातसोबत केलेले पूजा विधी नेमके कोणते होते, याबाबत विचारणा करण्यात आली. याशिवाय पूजा विधींमधून आर्थिक संबंध जोडले गेले होते का, खरातसोबतचे फोटो कोणत्या कार्यक्रमातील होते, तसेच आर्थिक व्यवहार कोणत्या बँक खात्यांमधून झाले, याबाबतही चौकशी करण्यात आली. तसेच शिवनिका संस्थानच्या बैठकीत कोणते कामकाज सुरू होते आणि मंदिरात इतर राजकीय नेते कोणाच्या सांगण्यावरून येत होते, यासंदर्भातही एसआयटीने चाकणकर यांना प्रश्न विचारले.
दरम्यान, या चौकशीनंतर एसआयटी रुपाली चाकणकर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार का, याकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.