
Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर ठाम आहेत. जागेचा तिढा सुटत नसेल तर या जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत लढण्याचं आवाहानही किशोर पाटील यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाची आज जागा दिसत असली तरी वाणी साहेबांच्या रूपाने ही जागा शिवसेनेचीच होती. जळगावमध्ये आज आमचे पालकमंत्री आहेत पाच आमदार आहेत. भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात आमचा मोठा भाऊ आहे. दोघेही लोकसभेचे सदस्य भापजचे आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विना शर्त आमच्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्यामुळे आता आम्ही जर विधान परिषदेची जागा मागत आहोत तर भाजपने एक पाऊल मागे जात ही जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी यावेळी किशोर पाटील यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना देखील टोला लगावला आहे. जळगाव विधान परिषदेसाठी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी गुलाबराव पाटील हे आग्रही आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना किशोर पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. प्रतापराव पाटलांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी गुलाबराव पाटलांचे देखील अभिनंदन करेल. गुलाबराव पाटलांनी उमेदवार जाहीर करण्यापेक्षा आधी जळगावची जागा पदरात पाडावी. अजून जागा मिळाली नाही आणि आम्ही उमेदवार जाहीर करतो, असं यावेळी किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उमेदवार जाहीर करायचा असेल तर स्वतंत्र लढण्याची ताकद ठेवा. आम्ही आपल्या सोबत आहोत, असं म्हणत यावेळी किशोर पाटील यांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तर दुसरीकडे भाजप देखील या जागेसाठी आग्रही असल्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, की या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.