
पुण्यातील विषारी दारू प्रकरणात 15 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या पुरवठ्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी येथे मोठी कारवाई करत संशयित मिथेनॉलचा मोठा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान तब्बल 1526 किलो संशयित मिथेनॉल जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात या मिथेनॉलचा वापर अवैध दारू निर्मितीसाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ज्या ठिकाणी मिथेनॉलचा साठा आढळून आला ते गाळे तात्काळ सील करण्यात आले असून संपूर्ण साठा प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. तपासादरम्यान पुण्यातील विषारी दारू प्रकरणासाठी लागणारे मिथेनॉल रेक्स इंटरनॅशनल कंपनीकडून पुरवले गेल्याची बाबही समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भिवंडी पोलीस ठाण्यात कंपनीच्या दोन्ही मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून मिथेनॉल पुरवठ्याचे संपूर्ण नेटवर्क आणि त्यामागील साखळी उघड करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक चौकशी केली जात आहे.