
मुंबई महानगरपालिकेला धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची तसेच त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या व्यक्तीने थेट ई-मेल पाठवत महापौरांची अधिकृत गाडी आणि महापालिका मुख्यालयातील केबिन बॉम्बने उडवून देण्याचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
धमकीचा ई-मेल मिळताच महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा आणि सायबर सेलने तपास सुरू केला आहे. संबंधित ई-मेल कोणत्या IP Address वरून पाठवण्यात आला, याचा शोध तांत्रिक पद्धतीने घेतला जात आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेनंतर आता मुंबई महानगरपालिकेलाही धमकी मिळाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिका मुख्यालय परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.