
संजय राऊत आणि उद्धव ठाकरेImage Credit source: Tv9 Network
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या खासदारांना फोडण्याच्या प्रयत्नात मोठा घडामोडी घडत असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे. काही खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या सगळ्यामागे खरा चेहरा कोणाचा आहे? ते चार्टर्ड विमान कोणी बुक केले होते? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
चार्टर्ड विमानाने दिल्ली गाठली
सूत्रांच्या माहितीनुसार, नागेश पाटील आष्टीकर हे रात्री १ वाजता पुण्याहून खासगी विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. सुरुवातीला दुपारी ३ वाजता, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आणि नंतर रात्री ९ वाजता दिल्लीला रवाना होण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मात्र, अखेरीस रात्री १ वाजता खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याचे समजते.
कोणाच्या नावावर विमान बुकींग?
सूत्रांनी दिलेली सर्वात मोठी माहिती म्हणजे, खासदारांना दिल्लीला नेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर पुणे विमानतळावर दोन खासगी विमाने सज्ज ठेवण्यात आली होती. विमानांची बुकिंग आणि तयारी श्रीकांत शिंदे यांच्या नावावर करण्यात आली होती. यामुळे ठाकरे गटातील खासदारांना फोडण्यामागे कोणाचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत आणि जयराजे निंबाळकर हेही ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व नेत्यांच्या दिल्लीतील उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय अर्थ काय?
ठाकरे गटातील खासदारांना दिल्लीला बोलावून घेणे, त्यासाठी खासगी विमानांची व्यवस्था करणे आणि तेही एका विशिष्ट नेत्याच्या नावावर बुकिंग करणे या सर्व घटनांमुळे “फोडाफोडी” ची रणनीती आखली जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता आहे, ज्यात पक्षांतर किंवा बंडखोरीला चालना मिळू शकते. या घडामोडींवर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काही तासांत मोठा राजकीय निर्णय किंवा घोषणा होण्याची शक्यता आहे.