
वाहन अपघात विमा Image Credit source: एजन्सी
Car Insurance Claim: गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पुण्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. वाहनं पाण्याखाली गेली आहेत. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. त्यामुळे घरासह दुकानात पाणी शिरले आहेत. कार, इतर वाहनं ही पाण्यात बुडाली. तर काही परिसरात दुचाकी, चारचाकीवर झाडं पडून मोठं नुकसान झालं. अशावेळी वाहनधारकाला विम्याचा दावा करता येतो का? विमा कंपन्या त्याला नुकसान भरपाई देते का? काय आहे याविषयीचा नियम?
Comprehensive Insurance ची सुरक्षा
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. झाडाच्या फांद्या, पत्रे, दगड, भिंत कोसळून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सिग्नलवर तर काही ठिकाणी धावत्या वाहनांवर झाडं पडल्याच्या घटनेने वाहनधारक हादरले आहेत. मुंबई, ठाणे, पुण्यात या घटना घडल्या आहेत. झाड पडल्याने कारचे बोनट, छत अथवा विंडशील्ड तुटते. अथवा संपूर्ण कारच झाडाखाली दबते. वाहनांचे मोठे नुकसान होते. अशावेळी Comprehensive Insurance मधून अशा नुकसानीची भरपाई मिळते. थर्ड पार्टी पॉलिसीमध्ये त्याची तरतूद नसते. परिणामी काही फायदा होत नाही.
कंबरेएवढ्या पाण्यात गाडी, इंजिन खराब झालं तर विमा मिळतो?
सध्या मुंबईसह ठाण्यातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. अनेक भागात कंबरेएवढे पाणी साचले आहे. यामध्ये अनेक गाड्या, वाहनं अडकली आहेत. अशा पाण्यातून कार नेण्याचा प्रयत्नही धोकादायक ठरतो. त्यामुळे वाहनाचे इंजिन खराब झाल्यास विमा कंपन्या त्याला नुकसान मानत नाहीत. इंजिन बंद झाल्यास त्याला हायड्रोस्टॅटिक लॉक म्हणतात. विमा कंपन्या असा दावा मंजूर करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यावरून कंपनी आणि ग्राहकांमध्ये टोकाचे वाद होतात.
कार-दुचाकीचे नुकसान झाल्यावर काय कराल?
मोबाईलच्या हायपिक्सल कॅमेऱ्यातून नुकसानग्रस्त कारचे फोटो काढा. व्हिडिओ तयार करा.
विमा कंपनीला लागलीच या घटनेची अगोदर माहिती द्या.
मोबाईल ॲप आणि कंपनीच्या साईटवर विमा क्लेम दाखल करा.
विमा कंपनीकडे आवश्यक दस्तावेज जमा करा.
पॉलिसी क्रमांक, वाहनांचे कागद दिल्यानंतर नुकसानीचा दावा करा.
सर्व्हेयरची वाट पाहा. जोपर्यंत सर्व्हेयर येत नाही. तोपर्यत कार दुरुस्तीला पाठवू नका.