
महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केलीय. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोगरा गँगशी कनेक्शन असलेल्या कथित संबंधितांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत विविध जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यानंतर एटीएसने 100 हून अधिक जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे.
एटीएसने बुधवारी सकाळी 8 वाजता मुंबई, पुणे, नागपूर, नालासोपारा, मीरा रोड, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव या प्रमुख शहरांत छापे टाकले. पाकिस्तानी गँगस्टरने भारतात तयार केलेले नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एटीएसने छापा टाकला. ताब्यात घेतलेले 100 हून अधिक जण हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानातील गुन्हेगारांच्या संपर्कात होते, असा संशय आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गँगस्टर हे सोशल मीडियाचा वापर करून भारतातील काही तरुणांच्या संपर्कात होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गँगस्टरकडून बेरोजगार तरुणांना लझ्जरी लाइफस्टाइल आणि पैशांचं आमिष दाखवून गुन्हेगारी जाळ्यात अडकवले जात आहे. या एटीएसच्या कारवाईचा उद्देश हा स्लीपर सेल, गुन्हेगार, पाकिस्तानी नेटवर्कशी संबंधित लोकांना टार्गेट करण्यासाठी होता. या गँगस्टरच्या नेटवर्कशी संबधित तरुणांकडून गुन्हेगारी कट आणि शस्त्र तस्करी केली जात असून ती हाणून पाडण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
एटीएसने छाप्यादरम्यान संशयिताकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. आता एटीएसकडून संशयिताची बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान किंवा इतर देशांमधून फंड पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
The Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) is conducting searches at multiple locations across the state in connection with an investigation into the alleged social media links of several individuals with Pakistan-based gangster Shahzad Bhatti. Raids are underway in Mumbai,… pic.twitter.com/10PTSq4AVZ
— IANS (@ians_india) July 10, 2026
कोण आहे शहजाद भट्टी?
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहणारा शहजाद भट्टी हा मागील काही महिन्यांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. 45 वर्षीय भट्टी याच्या विरोधात भारतातील दहशतवादी नेटवर्क वाढवणे, हेरगिरीशी संबंधित डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. भट्टी हा सध्या दुबईतून नेटवर्क चालवत आहे. तो पाकिस्तान आणि आशियातील काही देशांत वारंवर प्रवास करत असतो. त्याने मार्च 2024 मध्ये जालंधरमध्ये युट्युबर रॉजर संधूच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्याच्यावर बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार झीशान अख्तरला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप आहे.
एटीएसकडून त्या 13 जणांचा शोध
एटीएसने मोठी समांतर कारवाई केली आहे. पाकिस्तानस्थित भट्टीच्या युजर आयडीशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी एटीएसच्या संभाजीनगर युनिटने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत धाडसत्र राबवलंय. या कारवाईत छत्रपती संभाजीनगरमधून 9, जालन्यातून 2, बीडमधून 1 आणि धाराशिवमधून 1 अशा एकूण 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांना पुढील चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील एटीएस कार्यालयात आणण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
संभाजीनगरच्या एटीएस पथकाची कारवाई
जालना जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अंबड आणि भोकरदन तालुक्यातून प्रत्येकी एकाला असे एकूण दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी गँगस्टर असलेल्या भट्टी याच्या युजर आयडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा संशय ATS ला होता. त्यानंतर या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. भोकरदन तालुक्यातील जांभळा येथील अनिस शेख आणि अंबड तालुक्यातल्या म्हसई तांडा येथील भरत जाधव अशी या संशयितांची नावे आहेत. त्यांचा नेमका उद्देश काय होता? त्यांनी या युजर आयडीशी संपर्क का साधला? याचा सखोल तपास एटीएस कडून केला जातोय. त्यामुळे चौकशीनंतरच या प्रकरणातील नेमकी माहिती स्पष्ट होणार असल्याचही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.