
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना सातत्याने पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचं आवाहन करत आहेत. नुकतीच केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोल-डिझेलच्या दरात 3 रुपये वाढ केली. या सगळ्याला अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय परिस्थिती जबाबदार आहे. पेट्रोल-डिझेलची बचत व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला आहे. त्याशिवाय नोकरीवर जाणाऱ्यांनी व्यक्तीगत कार, बाईकने प्रवास करण्याऐवजी कार पुलिंगचा पर्याय वापरावा असा सल्ला दिला आहे. कार पुलिंगमुळे इंधनाची बचत होतेच. पण रस्त्यावर वाढणारं ट्रॅफिकही टाळता येतं. परवडणाऱ्या दरात नोकरदारांना ऑफिस गाठता येतं. यात सध्या कॉर्पोरेट नोकरदारांमध्ये ‘लिफ्टलेलो’ बेस्ट ऑप्शन ठरत आहे.
2017 साली शैलश दुबे यांच्या कल्पनेतून ‘लिफ्टलेलो’ संकल्पनेची सुरुवात झाली. सुरुवातीला अगदी छोट्या पातळीवर ही सेवा सुरु झाली. शैलश दुबे हे नवी मुंबई इथे राहणारे सॉफ्टवेअर एक्सपर्ट आहेत. आज या ‘लिफ्टलेलो’ कारपुलचा एक मोठा परिवार तयार झाला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधून जवळपास 35 हजार लोक या कारपूल प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहेत. ‘लिफ्टलेलो’ ची सेवा फक्त ऑफिस प्रवासाच्या मार्गावरच केंद्रीत आहे. एकाच दिशेने जाणारे लोक, कोणा एकाच्या गाडीतून प्रवास करतात. यामध्ये इंधनाची बचत होतेच. शिवाय रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुद्धा कमी होते. ‘लिफ्टलेलो’ ही नो प्रॉफिट-नो लॉस तत्वावर चालणारी सेवा आहे. यात कुठलही कमिशन आकारलं जात नाही. कारमधून प्रवास करणारे त्या कार मालकाला टोल आणि पेट्रोल-डिझेलचे पैसे शेअर करुन देतात.
ही कल्पना कशी सुचली?
शैलश दुबे विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. “मुंबईवरुन नवी मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर प्रवासामध्ये बराच वेळ जायचा. माझं ऑफिस लोअर परेलच्या कमला मिल्समध्ये आहे. कार घेऊन रोज एकटा ऑफिसला जायचो. दोन-अडीच तास प्रवासात जायचे. त्यावेळी शेकडो लोक कारमधून एकट्याने एवढा लांबचा प्रवास करत असल्याचं लक्षात आलं. इंधनाच्या किंमती, टोलचा चार्ज, पार्किंगचे पैसे आणि प्रवासाचा ताण सतत वाढतच होता. एकाच मार्गावर ऑफिस असणाऱ्या लोकांनी जर एकाच कारमधून प्रवास केला, तर त्यामुळे पैसे वाचतील, ट्रॅफिक कमी होऊन वेळचीही बचत होईल. प्रवास जरा अजून सोपा होईल” त्यातून लिफ्टलेलोची सुरुवात झाल्याचं शैलश यांनी सांगितलं. WhatsApp कम्युनिटी, लिफ्टलेलो मोबाइल APP च्या माध्यमातून तुम्ही या सेवेचा फायदा घेऊ शकता.