
देशभरातील नागरिकांना आज सकाळीच महागाईचा मोठा धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशभरात तब्बल 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवीन दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 3 रुपये 14 पैशांची वाढ झाली असून, पेट्रोलचा दर आता 97 रुपये 97 पैशांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर 90 रुपये 67 पैशांवर गेला आहे. याशिवाय, सीएनजीच्या दरातही 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
इराण-अमेरिका संघर्ष आणि मध्य पूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा थेट परिणाम आता भारतातील इंधन दरांवर दिसून येत आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.