
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) निराशाजनक सुरुवात राहिली. सीएसकेला पहिल्या आणि सलग 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे चेन्नईवर चहुबाजूने टीका करण्यात आली. मात्र त्यानंतर चेन्नईने जोरदार मुसंडी मारली. चेन्नईने सलग 2 सामने जिंकून अप्रतिम कमबॅक केलं. चेन्नईने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्स आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली. सीएसकेने यासह 2024 नंतर पहिल्यांदाच सलग 2 सामने जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर आता चेन्नईच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. सीएसकेचा अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी 16 एप्रिलला मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
चेन्नई या मोहिमेतील आपला सहावा सामना हा 18 एप्रिलला खेळणार आहे. चेन्नईसमोर या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी 18 एप्रिलच्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
धोनीला दुखापतीमुळे सलग आणि पहिल्या 5 सामन्यांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे धोनी हैदराबाद विरूद्धच्या सामन्यासाठी उपल्बध असणार का? माही प्लेइंग ईलेव्हनचा भाग असणार का? या प्रश्नाचं उत्तर यलो आर्मीच्या चाहत्यांना मिळण्याची शक्यता आहे.
सीएसके विरुद्ध एसआरएच यांच्यातील सामना हैदराबादला होणार आहे. रेव्ह स्पोर्ट्सनुसार, धोनी 16 एप्रिलला सकाळी हैदराबादला जायचं की नाही? याबाबत अतिंम निर्णय घेणार आहे. धोनीच्या या निर्णयानंतर तो हैदराबाद विरुद्ध खेळणार की नाही? हे स्पष्ट होईल. धोनी हैदराबादच्या दिशेने प्रवासाला निघाल्यास एसआरएच विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. मात्र धोनी न गेल्यास चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल.
धोनी आणि दुखापत
धोनीची दुखापतीसह झुंज सुरु आहे. धोनीचे दुखापतीतून बाहेर येण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. धोनीवर फिजिओ आणि सपोर्ट स्टाफ बारीक लक्ष ठेवून आहेत. धोनीला दुखापतीमुळे एकूण 5 सामन्यांतून बाहेर रहावं लागलं आहे. आता धोनी सलग सहाव्या सामन्याला मुकणार की चाहत्यांची प्रतिक्षा संपणार? हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.
सीएसके पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
ताज्या आकडेवारीनुसार, सीएसके पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी विराजमान आहे. चेन्नईने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. चेन्नईने या 5 पैकी 3 सामने गमावले आहेत. तर एकूण 2 सामने जिंकले आहेत. चेन्नईच्या खात्यात एकूण 4 गुण आहेत.