
PAK vs BAN Test: बांगलादेशने पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवलं, 104 धावांनी दणदणीत विजय मिळवलाImage Credit source: BCB Twitter
बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. यासह दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि कर्णधार शान मसूदने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. पहिल्या डावात बांगलादेशने 413 धावा करत भक्कम स्थिती निर्माण केली. पहिल्या डावात या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ कसाबसा 386 धावांपर्यंत पोहोचला. बांगलादेशला पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात बांगलादेशने 240 धावा केल्या आणि 9 विकेटनंतर डाव घोषित केला. पहिल्या डावातील 27 धावांच्या आघाडीसह 267 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 163 धावांवर गारद झाला. यासह बांगलादेशने कसोटी सामना 104 धावांनी जिंकला.
कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानला दुसऱ्या डावात 267 धावांचा पाठलाग करायचा होता. पण नाहिद राणाच्या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानची त्रेधातिरपीट उडाली. त्याच्या गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. त्याने 9.5 षटकात 40 धावा देत पाकिस्तानचा निम्मा संघ गारद केला. त्याने एकूण पाच विकेट घेतल्या. तर तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याचबरोबर मेहिदी हसन मिराजने एक विकेट काढली. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात अब्दुल्ला फझल याने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्याच्याशिवाय कोणताही फलंदाज तग धरू शकला नाही.
The final blow. Shaheen Shah Afridi falls. Bangladesh rise 🇧🇩 pic.twitter.com/KhyyFbSXB4
— Bangladesh Cricket (@BCBtigers) May 12, 2026
बांगलादेशने पाकिस्तानला सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. यापूर्वी पाकिस्तान बांग्लादेश हे 2024 मध्ये आमनेसामने आले होते. ही मालिका पाकिस्तानात झाली होती आणि दोन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने बाजी मारली होती. पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत क्लिन स्वीप दिला होता. . बांगलादेशने रावळपिंडी येथे पहिला कसोटी सामना 10 गडी राखून आणि दुसरा 6 गडी राखून जिंकला होता. आता 104 धावांच्या मोठ्या विजयासह बांगलादेशने विजयांची हॅटट्रिक साधली आहे. बांगलादेशने झिम्बाब्वेनंतर पाकिस्तानला सलग तीन कसोटी सामन्यात पराभूत केलं आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात काय निकाल लागतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.