
नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण अजून चर्चेत असतानाच, हिंजवडीतील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीबाबत नवा वाद समोर आला आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रांती कक्षांचा वापर धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे.
मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याविषयी माहिती दिली आहे. काही कर्मचाऱ्यांना या काळात रूममध्ये प्रवेश नाकारला जात असल्याची तक्रारही पुढे आली आहे. कार्यस्थळी सर्वांना समान सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मिसाळ यांनी पोलिसांना महिला कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव किंवा त्रास होत आहे का, याची गोपनीय चौकशी करण्यासही सांगितले आहे. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.